जालना : शहरातील अत्यंत वर्दळीचे असलेले पाच रस्ते वर्षानुवर्षे कठड्यांविना असून ते धोकादायक बनले आहेत. या मार्गांवर सातत्याने अपघाताच्या छोट्या-मोठ्या घटना घडतात. परंतु संबंधित यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.गरीबशहा बाजार ते मस्तगड या कुंडलिका नदीच्या पुलाचा रस्ता अरूंद आहे. तसेच या रस्त्यावर खड्डे पडल्याने अनेक वाहनधारक खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करतात. मात्र काही भागात पुलाचे कठडे गायब असल्याने रस्ते चुकविताना वाहन घसरून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकडे सा.बां. विभागाने तसेच नगरपालिकेनेही लक्ष देण्याची गरज आहे.कन्हैय्यानगरजवळ सीना नदीवर असलेल्या पुलावर मागील पाच ते सहा वर्षांपासून दोन्ही बाजूंचे कठडे गायब झालेले आहेत. या पुलावरून जवळच असलेल्या गायत्रीनगर शाळेत अनेक विद्यार्थी पायी ये-जा करतात. तसेच नवीन मोंढा याच रस्त्यावर असल्याने शहरातील व्यापारी, कामगार तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या वाहनांची मोठी वर्दळ असते. गेल्यावर्षी या पुलावर कठडे नसल्याने मारोती व्हॅन उलटून दोघेजण ठार झाले होते. लक्कडकोट ते देहेडकरवाडी रस्त्यावर चोवीस तास वाहतूक असते. मात्र या पुलावरील कठडेही मोठ्या प्रमाणात गायब झालेले आहेत. सायंकाळनंतर हा रस्ता अंधारात असतो. येथेही अपघाताच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. परंतु सरकारी यंत्रणेकडून त्याकडे दुर्लक्ष होते. भोकरदन नाका ते औरंगाबाद रस्त्यावर रामतीर्थ स्मशानभूमीच्या पुलासमोरील छोट्या पुलाच्या रस्त्यावर देखील कठडे नाहीत. या ठिकाणी देखील अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. मोती तलावासमोरील बायपास रस्त्यावरील कठडे देखील गायब झालेले असून काही वर्षांपूर्वी या रस्त्यावरून ट्रक योगेश्वरी कॉलनीच्या मागील बाजूस पलटी झाला होता. शहरातील प्रमुख मार्गांमध्ये या पाचही रस्त्यांचा समावेश होतो. विशेष म्हणजे या रस्त्यांवर अपघातांच्या अनेक घटना घडल्या. वारंवार लक्ष वेधूनही दखल घेतली जात नाही. (प्रतिनिधी)
कठड्यांविना पूल धोकादायक
By admin | Updated: June 15, 2015 00:11 IST