व्यंकटेश वैष्णव . बीड
आतापर्यंत झालेल्या पावसाने खरिपाची पिके जोमात असली तरी बोटावर मोजण्याइतके लघुप्रकल्प वगळता बहुतांश तलाव, धरणे कोरडीठाकच आहेत. अर्धा पावसाळा संपला तरीही धरणे भरलीच नाहीत. त्यामुळे मागचे दिवस आठवण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात एकूण १४३ सिंचन प्रकल्प आहेत. पावसाळा थोडा उशिरा सुरू झाला असला तरी आतापर्यंत एकूण सरासरीच्या तुलनेत ४५.५८ टक्के म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत पावसाची तिप्पट अधिक पर्जन्यमानाची नोंद आहे. शासन दरबारी मि.मी. मध्ये पावसाची नोंद बऱ्यापैकी दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी धरण क्षेत्रांमधील जलसाठा होणे आवश्यक आहे. पाटबंधारे खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ४ लघु, तर २ मध्यम प्रकल्पांत अत्यल्प पाणी साठा (मृतसाठा) उपलब्ध झाला आहे. १४३ प्रकल्पांत २ मोठे प्रकल्प आहेत. यापैकी मांजरा धरण कोरडे आहे, तर बीड शहराची जीवनदायिनी ठरलेल्या माजलगाव बॅक वॉटर प्रकल्पात ७८.२० द.ल.घ.मी. पाणी साठा असल्याचे पाणीपुरवठा अभियंता एम.एस. वाघ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. हे पाणी मृतसाठ्यात असल्याचेही ते यावेळी म्हणाले. जलयुक्तमुळे तात्पुरता आधार बीड जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बांधण्यात छोट्या छोट्या बंधाऱ्यात पाणी साठले आहे. याचा परिणाम काही विहीर व बोअर यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ज्या भागात खडकाळ जमीन आहे, त्या भागातच पाणी पातळी वाढली आहे. अन्यथा ज्या भागात कडक खडक आहेत, त्या भागात अजून तरी विहिरी, बोअर कोरडेठाक आहेत. आजघडीला केज, धारूर या तालुक्यांमध्ये ३५ च्या वर टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने मात्र भूजल सर्वेक्षण विभागाचा पाणी पातळी वाढली नसल्याचा अहवाल असताना देखील बीड तालुक्यातील टँकर सरसकट बंद केले आहेत. यामुळे काही गावांना भरपावसाळ्यातही पाणी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ज्या लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा झालेला आहे, तो देखील मृतच आहे. त्यामुळे ते पाणी सध्या तरी पिण्यासाठी वापरता येणे शक्य नसल्याचे पाटबंधारे विभागातील तज्ज्ञांचे मत आहे.