पाटोदा: येथे नळ योजनेसाठी जेसीबी मशीनद्वारे पंधरा दिवसांपासून खोदकाम सुरू आहे. यामुळे बीएसएनएलची केबल वायर तुटली आहे. परिणामी मंगळवारी पाटोदा शहरातील बॅँका, पतसंस्थांसह सर्वच ‘आॅनलाईन’ व्यवहार ठप्प होते. यामुळे मंगळवारी तब्बल तीस कोटींच्या व्यवहारांना ‘खीळ’ बसल्याची शक्यता येथील व्यापाऱ्यांतून वर्तविली जात आहे. पाटोदा शहरातील शिवाजी नगर व माऊली नगरसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून पाईपलाईनचे काम सुरू आहे. यासाठी जेसीबी मशीनने खोदकाम करण्यात येत आहे. खोदकाम केल्यानंतर माती रस्त्यावर टाकली जाते. अशावेळी पाऊस झाल्यानंतर रस्ते निसरडे बनत आहेत. निसरड्या रस्त्यावरून अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना येथे घडलेल्या आहेत. असा प्रकार येथे गेल्या पंधरा दिवसांपासून होत आहे. दुसरी बाब म्हणजे रस्त्यावरील कोरडी माती वाहनामुळे उडते व ती माती इतर दुचाकीस्वारांसह प्रवाशांच्या डोळ्यात जाते. असे प्रकार येथे होत असून आता भरीस भर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शहराला जोडणारा नवीन पुल, या दरम्यानचे सध्या काम सुरू आहे. सदरील खोदकाम करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या बीएसएनएलच्या दुरध्वनीच्या केबल तुटल्या आहेत. परिणामी येथील ‘ब्रॉडबॅँड’ व्यवस्था कोलमडली आहे. पाटोदा शहरात बॅँका, व्यापारी पेठ आदी ठिंकाणी व्यवहार करण्यासाठी तालुकाभरातून दररोज मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ येतात. येथील बॅँकेसह विविध ठिकाणी दररोज ३० कोटींपेक्षा अधिक व्यवहार होत असल्याची माहिती येथील व्यापारी कल्याण भोसले, बालासाहेब कवडे यांनी दिली. येथील स्टेट बॅँक आॅफ हैदराबाद येथील व्यवहारही मंगळवारी दिवसभर बंद होते. इंटरनेट सेवा कोलमडल्यामुळे फिक्स डिपॉझिट करणे, डीडी काढणे, रक्कमांचे हस्तांतरण, पीक विमा, पीक कर्ज, शासकीय व्यवहार, मोबाईल बॅँकिंग आदी व्यवहार ठप्प असल्याची माहिती येथील व्यवस्थापक दीपक खोत यांनी दिली. या बॅँकेत सकाळपासून नागरिक खेटे घालीत होते. आल्या पावली त्यांना परतावे लागत होते. सायंकाळपर्यंत व्यवहार सुरळीत न झाल्याने अनेकांची कामे खोळंबली होती. येथील स्टेट बॅँक आॅफ इंडिया बॅँकेतीलही सर्वच व्यवहार ठप्प होते. त्यामुळे तब्बल पाच कोटींपेक्षा अधिकच्या व्यवहार झाले नसल्याचे येथील व्यवस्थापक रवींद्र वाल्हे यांनी सांगितले. या दोन बॅँकांसह वैद्यनाथ अर्बन बॅँक, छत्रपती शाहू बॅँक यासह विविध पतसंस्थेतील कामकाजही ठप्प होते. यामुळेही अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागला. शहरातील कही भागातील नागरिकांचे दुरध्वनीही बंद होते. तसेच इंटरनेट सेवाही बंद होती. त्यामुळे सामान्य नागरिकांनाही याचा फटका सहन करावा लागला. सदरील सेवा सुरळीत करण्याची मागणी व्यापारी सतीश कांकरिया, अजित कांकरिया, मुुसलम चाऊस यांनी केली. सेवा सुरळीत होण्यास आणखी दोन दिवस लागतील, असे बीएसएनएलचे अभियंता श्रीकांत पांडव यांनी सांगितले. (वार्ताहर)
खोदकामाने व्यवहार ठप्प..!
By admin | Updated: August 20, 2014 01:53 IST