नितीन कांबळे , कडाआष्टी तालुक्यातील कडा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सोमवारी सर्वच्या सर्व १८ जागा जिंकून माजी मंत्री सुरेश धस यांच्या शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय संपादन केला. नगरपंचायतपाठोपाठ कृउबास निवडणुकीतही धस हे आ. भीमराव धोंडे यांना भारी ठरले. कडा कृउबा निवडणुकीतील संचालकपदाच्या १८ जागांसाठी रविवारी दोन केंद्रांवर मतदान झाले होते. २ हजार ३२२ पैकी २ हजार २४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सोमवारी कडा कृउबाच्या गोदामात सहा टेबलवर मतमोजणीस सुरुवात झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट झाले. माजी मंत्री सुरेश धस यांनी शेतकरी विकास तर आ. भीमराव धोंडे यांनी शेतकरी बचाव पॅनल आखाड्यात उतरविला होता. सर्वच १८ जागा जिंंकून धस यांनी कृउबावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.निकाल जाहीर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. शहरातून माजी मंत्री सुरेश धस व नवनिर्वाचित संचालकांची ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.माजीमंत्री धस यांच्या मिरवणुकीचे रुपांतर सभेत झाले. मौलाली बाबा दर्गाह परिसरात झालेल्या सभेत धस यांनी आ. धोंडे यांच्यावर हल्लाबोल केला. भाजपवाल्यांनी जनतेची फसवणूक केली. त्यामुळे त्यांनी आता गुलाल विसरावा. नगरपंचायत निवडणुकीपाठोपाठ कृउबा निवडणुकीत मतदारांनी साथ दिली. या विश्वासाला पात्र राहून कामे करु, अशी ग्वाही त्यांनी दिली.नवनिर्वाचित संचालक असे...व्यापारी मतदार संघातून योगेश भंडारी, सुखलाल मुथ्था, हमाल मापाडी मतदार संघातून रावसाहेब गाडे, ग्रामपंचायत मतदार संघातून रमजान तांबोळी, अशोक पवार, आनंदा साबळे, कमल मिसाळ, सेवा सोसायटी मतदार संघातून कुसुम तरटे, पुष्पा माळशिखरे, शिवाजी अनारसे, अशोक ढवण, नवनाथ जगताप, दत्तात्रय जेवे, रमेश डोके, राजेंद्र दहातोंडे, हिरालाल बलदोटा, जनार्दन भवर, शत्रुघ्न मरकड हे विजयी झाले आहेत.
कडा कृउबावर राकाँचा झेंडा
By admin | Updated: November 30, 2015 23:33 IST