औसा : हवामानावर आधारित पीक विमा भरण्यासाठी सोमवार हा अंतिम दिवस होता. त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या औसा शाखेत गर्दी केली होती.मृग नक्षत्र कोरडे गेले. आर्द्राही अर्ध्यापेक्षा अधिक कोरडा गेला. पेरण्या लांबल्या. पाऊस नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. शेतकरी उद्ध्वस्त होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. आता शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून, शेतीची अवस्था ‘धरताही येईना आणि सोडताही येईना’ अशी झाली आहे. हवामानावर आधारित पीकविमा भरून तो तरी मिळेल, ही अपेक्षा ठेवून शेतकरी विमा भरण्यासाठी सोमवारी गर्दी करीत असल्याचे चित्र दिसून येत होते. ३० जून ही तारीख हवामानावर आधारित पीकविमा भरण्याची अंतिम तारीख होती. त्यामुळे आज बँकांच्या विविध शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. परंतु, यातील बऱ्याच शेतकऱ्यांना हवामानावर आधारित पीकविम्याची सविस्तर माहिती व मार्गदर्शन न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी या पीक विम्यापासून वंचित राहिले. त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकरी बांधवांकडून केली जात आहे. (वार्ताहर)
हवामानावर आधारित पीक विमा भरण्यासाठी बँकेत गर्दी
By admin | Updated: July 1, 2014 01:03 IST