वडवणी : शौचास गेलेल्या विवाहितेचा धारदार शस्त्राने खुपसून खून केल्याची घटना वडवणी तालुक्यातील कान्हापूर येथे घडली होती. या प्रकरणी मयत विवाहितेच्या पतीसह सासरा, सासू व अन्य एकाविरूद्ध वडवणी ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परमेश्वर पांडुरंग चव्हाण (पती), पांडुरंग चव्हाण (सासरा), ताराबाई चव्हाण (सासू) व अन्य एकाचा आरोपीत समावेश आहे. रमा परमेश्वर चव्हाण ही शौचास गेली असता तिचा खून करण्यात आला होता. रमा हिचा परमेश्वर यांच्यासोबत पाच महिन्यापूर्वी विवाह झाला होता. तिचा खून झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची गती वाढवली होती. त्यानंतर मंगळवारी रमा हिची आई कौशल्या मच्छिंद्र दळवी यांनी वडवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी तक्रारीत म्हटले की, रमा ही माहेरी येत असे. तिचा पती परमेश्वर याचे मोठ्या भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. याची माहिती रमाला कळाली होती. त्यामुळे ती नेहमी माहेरी येत असे. यातूनच रमा हिचा पती, सासू, सासरा, जाऊ यांनी संगनमताने जीवे मारले आहे. याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)
विवाहितेच्या खून प्रकरणी चौघांवर गुन्हा
By admin | Updated: September 9, 2015 00:05 IST