भोकरदन/जालना : वाळूने भरलेले टिप्पर पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रविवारी टिप्पर ( एम.एच २१ एक्स ८२८२) चालक आणि मालकाविरूध्द भोकरदन पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शुक्रवारी सायंकाळी तालुक्यातील नळणी पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून टिप्पर घेऊन जात असताना भोकरदनचे उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी यांनी नळणी फाट्याजवळ टिप्पर पकडले. याची माहिती गवळी यांनी तात्काळ भोकरदन पोलीस ठाण्याला दिली. दोन्ही टिप्पर तहसील कार्यालयात नेण्यासाठी पोलिसांना सूचना केल्या. दोन्ही टिप्पर तहसील कार्यालयात पोलीस नेत असतांना मोटरसायकलवर पोलीस समोर आणि वाळूची गाडी मागे असे जात असताना टिप्पर चालकांनी पोलिसांच्या दुचाकीला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिस सांगत आहेत. त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी टिप्पर दुचाकीवर घालण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावाधान राखून दुचाकीवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी दुचाकीवरून उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बुंदेले यांनी सांगितले. टिप्पर चालक व मालकाचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘त्या’ टिप्पर चालकावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
By admin | Updated: April 9, 2017 23:29 IST