आंबी : वाळू चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व पोलिसांना ट्रॅक्टर सोडायला सांगितल्याचे बक्षीस म्हणून २० हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या शेळगाव (ता़परंडा) येथील सरपंच बिभिषण माणिक दैन यांच्याविरूध्द आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सरपंचांनी १५ जानेवारी रोजी शेळगाव येथील चौकात लावण्यात आलेल्या सापळ्यावेळी पंचासमक्ष पैशांची मागणी केली होती़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेळगाव येथील तक्रारदाराने शेतीला जोड व्यवसाय म्हणून ट्रॅक्टर खरेदी केले आहे़ तक्रारदार शेतात राहत असल्याने घराचे बांधकाम करण्यासाठी त्यांनी पांढरेवाडी-शेळगाव शिवारातील खैरी नदीच्या पात्रातून ५ ब्रास वाळू आणून शेतातील घराजवळ ठेवली होती़ तक्रारदार यांच्या गावातील राहत्या घराच्या दुरूस्तीसाठी स्वत:च्या ट्रॅक्टरमधून वाळूची वाहतूक करताना संशय आल्याने अंबी पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली होती़ त्यावेळी ट्रॅक्टर सोडून देवून अधिक चौकशीसाठी तक्रारदाराला अंबी पोलीस ठाण्यात बोलाविले होते़ ही माहिती कळताच सरपंच बिभिषण माणिक दैन हे तक्रारदाराकडे आले़ त्यावेळी पोलिसांना सांगून तक्रारदार यांच्यावर भविष्यात वाळू चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच तक्रारदार यांचे ट्रॅक्टर सोडायला सांगितल्याचे बक्षीस म्हणून तक्रारदाराकडे २० हजार रूपये लाचेची मागणी केली़ सरपंचांनी लाचेची मागणी करताच तक्रारदाराने उस्मानाबादेतील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़तक्रार दाखल होताच उपाधीक्षक अश्विनी भोसले यांनी पोलीस अधीक्षक डॉ़ डी़एस़स्वामी, अपर पोलीस अधीक्षक डी़डीग़वारे यांच्या मार्गदर्शनाखाली १४ जानेवारी रोजी एसीबीच्या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली़ त्यावेळी सरपंच बिभिषण दैन यांनी पंचांसमक्ष २० हजार रूपये लाचेची मागणी केली़ त्यानंतर १५ जानेवारी रोजी सरपंच दैन यांच्याविरूध्द सापळा लावण्यात आला होता़ मात्र, दैन यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्विकारली नव्हती़ या कारवाईचा अहवाल वरिष्ठांकडे देण्यात आला होता़ वरिष्ठांच्या सूचनांनुसार या प्रकरणात सरपंच बिभिषण माणिक दैन यांच्याविरूध्द आंबी पोलीस ठाण्यात गुरनं १५/१६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोनि बाळासाहेब आघाव हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)
शेळगाव सरपंचाविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: March 15, 2016 01:10 IST