बिडकीन : भूखंडाच्या नोंदणीत वारंवार फेरबदल केल्याच्या आरोपाखाली बिडकीन ग्रामपंचायतचे पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांच्याविरुद्ध बिडकीन पोलीस स्टेशनमध्ये ४२० चा गुन्हा दाखल करण्यात आला.गुरुवारी रात्री अॅड. राजेंद्र किसनराव धरपळे, रा. फारोळा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १९९७ साली भारतनगरमधील प्लॉट क्र. १८ ते २२ हे अॅड. राजेंद्र धरपळे यांनी नसिबाबी खालेद यांच्याकडून विकत घेतले. त्याचे खरेदीखतही त्यांच्याकडे असून, तेच प्लॉट त्या मालकांनी शेख अयुबमियाँ व रेहनानी शेख, शेख शरीफ शे. बशीर यांना नोटरीद्वारे विक्री केले व त्यांच्या नावाने तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी नोंद लावली; परंतु सर्व पदाधिकारी यांच्या लक्षात आले की, १६ वर्षांपूर्वीच्या खरेदीखताद्वारे नोंद होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी ६-५-१३ रोजी अॅड. धरपळे यांच्या नावाचा ठराव रद्द करून तो पूर्ववत ठेवला. त्यानंतर अॅड. धरपळे यांनी माहितीच्या अधिकारान्वये माहिती घेतली असता सदर नोंदीमध्ये वारंवार फेरबदल होत असल्यामुळे त्यांनी ग्रामपंचायतीचे १६ सदस्य व ग्रामविकास अधिकारी सारंगधर लोढे, ग्रामपंचायत सदस्य वामन साठे, भारती शिंदे, अशोक धर्मे, विकास गोर्डे, सुनीता धर्मे, द्वारकाबाई धर्मे, अलका कोथिंबिरे, पुष्पा चाबूकस्वार, शेख रजिया, अमिनाबी पठाण, गभाबाई चव्हाण, मिर्झा मुनवर, लतीफ कुरेशी, सय्यद फेरोज, माणिक राठोड, सय्यद नशीबाबी सत्तार यांच्यासह नसिमाबी खालेद, शेख अय्यूब, रेहनाबी शेख, शेख शरीफ, शे. अजीम अशा २२ जणांवर कलम ४६३, ४६४, ४६६, ४६८, ४६९, ४७०, ४७७, ४२० (३४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपविभागीय अधिकारी अलसटवार यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. प्रमोद भातनाते तपास करीत आहेत. आम्ही दस्तऐवजात कुठलाही फेरफार केला नसल्याचे ग्रामपंचायत सदस्य अशोक धर्मे यांनी सांगितले.
बिडकीन ग्रा.पं.च्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
By admin | Updated: December 6, 2014 00:18 IST