औरंगाबाद : महाविद्यालये तसेच विद्यापीठस्तरावरील विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे प्रलंबित प्रश्न जागेवर सोडविण्यासाठी शुक्रवारी (दि.१२) मंत्री उदय सामंत यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या सचिव पातळीपासून सर्व अधिकारी औरंगाबादेत ‘मंत्रालय आपल्या दारी’ हा उपक्रम राबविणार आहेत.
यासंदर्भात पत्रकार परिषदेत कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता उच्चशिक्षण मंत्र्यांसह उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून लोकांचे प्रश्न, अडीअडीचणी ऐकून घेऊन त्या सोडविणार आहेत. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सर्वसंबंधित घटकांच्या सोयीसाठी विद्यापीठाच्या वेबसाइटच्या मुख्य पृष्ठावर ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ औरंगाबाद’ हे विशेष पोर्टल निर्माण केले आहे. या पोर्टलवर विद्यार्थी, नागरिकांना इंग्रजी अथवा युनिकोड मराठीतून आपले प्रश्न मांडता येणार आहेत. निवेदनाची सॉफ्ट कॉपी जोडण्याची व्यवस्थाही येथे करण्यात आली आहे. ज्यांना ऑनलाइन निवेदन सादर करणे शक्य होणार नाही, त्यांनाही प्रत्यक्ष उपस्थित राहून मंत्र्यांना निवेदन सादर करता येतील.
यावेळी प्र-कुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. दिगंबर गायकवाड, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
चौकट....
विद्यापीठातर्फे मांडले जाणार हे प्रश्न
- विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे भरण्यास परवानगी द्यावी.
- विद्यापीठ निधीतून भरती केलेल्या २८ प्राध्यापकांच्या पदांना शासनाने २०१६ मध्ये मान्यता दिली; पण अद्याप त्यांचे वेतन सुरू केलेले नाही. सध्या या प्राध्यापकांच्या वेतनाचा भार विद्यापीठालाच सहन करावा लागत आहे. त्यांचे वेतन सुरू करण्यात यावे.
- विद्यापीठात कार्यरत ४५० रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे.
- ‘अध्यासन भवन’ स्वतंत्र इमारत उभारण्यासाठी निधी द्यावा
- विद्यापीठात दोन वसतिगृहे उभारण्यासाठी निधीची तरतूद करावी.
- अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांबाबत