बीड: पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील रामेश्वर यात्रेत नर्तिका नाचविण्याची परवानगी पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी नाकारल्यानंतर आयोजक मुंबई उच्च न्यायालयात परवानगीसाठी गेले होते मात्र त्यांची याचिका फेटाळून लावली होती. विशेष म्हणजे आयोजकांनी नर्तिका नाचविण्यासाठी नव्हे तर लोकनृत्य करण्यासाठी बीड पोलिसांनी नकार दिला होता, असे सांगितले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सौताडा येथील रामेश्वर यात्रेत नर्तिका नाचविण्याच्या परवानगीसाठी पाच ते सहा आयोजक पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्याकडे महिनाभरापूर्वी आले होते. त्यावेळी अधीक्षकांनी त्यांना परवानी नाकारली होती, असा कार्यक्रम तुम्ही घ्याल तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही त्यांना रेड्डी यांनी दिली होती. त्यामुळे आयोजक मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गेले होते. याचिकेद्वारे रामेश्वर यात्रेत लोक नृत्य करण्यास पोलिसांनी नकार दिला होता, असा उल्लेख करण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. पोलीस अधीक्षकांकडे यात्रेत नर्तिका नाचविण्याची परवानगी मागितली होती. मात्र खंडपीठात सादर केलेल्या याचिकेत आयोजकांनी लोक नृत्यासाठी पोलीस प्रशासनाने परवानगी दिली नसल्याचे म्हटले होते. याचिकेवर सुनावणी करताना जिल्हा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने बंदिस्त तंबुत कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली होती. मात्र आयोजकांनी उघड्यावरच नर्तिका नाचविल्या. दरम्यान, सदरील यात्रेत नर्तिका नाचविण्याची परंपरा पूर्वपार चालत आलेली आहे़ मात्र दोन वर्षांपासून यात्रेत नर्तिका नाचविण्यावर बंदी घालण्यात आली़ गतवर्षीही नर्तिका नाचविल्या नव्हत्या़ मात्र यावर्षी यात्रेच्या महिनाभरापूर्वीच गावकऱ्यांनी नर्तिका नाचविण्यास परवानगी द्यावी, यासाठी गावकरी आग्रही होते़ प्रशासनाने फक्त बंदिस्त तंबूतील कार्यक्रमास परवानगी दिली होती मात्र येथे राजरोस उघड्यावर नर्तिका नाचवून नोटा उधळल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. नर्तिका नाचविल्या जात असल्याचे पाटोदा पोलिसांच्या निर्दशनास आले असता त्यांनी हा कार्यक्रम थांबविण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांवरच दगडफेक करण्यास सुरुवात केली व फरार झाले. याची गंभीर दखल घेत अधीक्षक रेड्डी यांनी आयोजक, नर्तिका व दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे तात्काळ पाच आयोजकांसह तेरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांवर लोकांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्या फिर्यादीवरुन नाना हरिभाऊ शिंदे, सचिन महादेव टेकाळे, गोवर्धन राजाराम शिंदे, सूर्यकांत उत्तम सानप, भाऊसाहेब श्रीराम शिंदे, रविंद्र शिवराम शिंदे, रामहरी जयसिंग सानप, किरण गुलाब शिंदे, विलास गंगाधर शिंदे, काळू देविदास शिंदे व पाच ते दहा अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना पोलिसांनी बुधवारी पाटोदा न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
न्यायालयाकडूनही मिळाला होता नकार
By admin | Updated: August 14, 2014 01:58 IST