चार जणांचा मृत्यू
मेदिनीनगर (झारखंड) : झारखंडच्या पालामू जिल्ह्यात लग्न समारंभाला हजर राहून बिहारमधील आपल्या घरी निघालेल्या एका कुटुंबातील चार जणांचा शुक्रवारी अपघातात मृत्यू झाला. कारचालकाचे नियंत्रण सुटून ती ट्रकवर धडकली, असे पोलिसांनी सांगितले. ही दुर्घटना राष्ट्रीय महामार्ग ९८ वर रात्री दोनच्या सुमारास घडली.
--------------
गुन्हेगार पोलिसांसोबत
चकमकीत मारला गेला
आझमगढ (उत्तरप्रदेश) : दलित नेत्याच्या हत्येत हवा असलेला व तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झालेला कुख्यात गुन्हेगार सूर्यांश दुबे हा येथे शुक्रवारी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला.
तीन महिन्यांपूर्वी बन्सगावातील ग्राम प्रधान सत्यमेव जयते यांच्या झालेल्या हत्येत दुबे पोलिसांना हवा होता.
---------------
बलात्कारित अल्पवयीन
मुलीने दिला मुलाला जन्म
मेदिनीनगर (झारखंड) : अपहरण करून बलात्कार करण्यात आलेल्या मुलीने (१६) पालामू जिल्ह्यात निवारागृहात मुलाला जन्म दिला, असे अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले. मे महिन्यात तिला संरक्षणासाठी या निवारागृहात आणण्यात आले होते व वैद्यकीय तपासणीत ती गरोदर असल्याचे उघड झाले होते. तिला पळवून नेऊन अत्याचार करणाऱ्याला अटक झालेली आहे.
-----------------
गायीच्या हत्येतील ६
जणांची हकालपट्टी
मुजफ्फरनगर : मुजफ्फरनगर जिल्ह्यातून खुद्दा खेड्यातील सहा जणांना गायीच्या हत्येच्या आरोपांवरून हाकलून लावण्यात आले आहे, असे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. ही कारवाई गुंडांविरोधातील कायद्याखाली जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशांवरून करण्यात आली. हे लोक गायीच्या हत्यांत सहभागी असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला होता.
---------------------
रेडिओलॉजिस्ट असल्याचे
भासवून लोकांची फसवणूक
मुजफ्फरनगर (उत्तरप्रदेश) : शामली जिल्ह्यातील कैरानात रेडिओलॉजिस्ट असल्याचे भासवून आणि बेकायदेशीररीत्या अल्ट्रासाऊंड शाखा चालवून लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून दोन जणांना अटक करण्यात आली, असे अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले. आरोग्य विभागाने त्या शाखेवर छापा टाकल्यावर पात्र व्यक्तींकडून ती चालवली जात नसल्याचे आढळले. या ठिकाणी गर्भलिंग निदान केले जात असावे, असा पोलिसांचा संशय होता.
---------------