औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे काऊंट डाऊन सुरू झाले आहे. मतमोजणीसाठी अवघे शंभर तास उरले असून, प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. मोजणीच्या ठिकाणी डाटा एंट्रीचे काम अचूक व्हावे याकरिता विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. शिवाय मोजणी करणार्या कर्मचार्यांना त्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. दरम्यान, लोकसभेच्या निमित्ताने औरंगाबादेत यावेळी पहिल्यांदाच शहराबाहेर मतमोजणी होत आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी १६ मे रोजी शेंद्रा एमआयडीसीत होणार आहे. चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या या मतमोजणीसाठी प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणीशी संबंधित आकडेवारी अचूक नोंदविल्या जावी यावर निवडणूक आयोगाचा भर आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने पावले उचलली आहेत. मतमोजणीच्या ठिकाणीच डाटा एंट्रीची व्यवस्था केली आहे. आकडेवारी अचूक आणि आयोगाने ठरवून दिलेल्या प्रपत्रानुसार नोंदविली जाण्यासाठी सध्या या कामाचा सराव सुरू आहे. मतदानस्थळी डाटा एंट्रीसाठी एकूण १२ कॉम्प्युटर, १२ प्रिंटर आणि ६ झेरॉक्स मशीन असणार आहेत. डाटा एंट्रीच्या प्रक्रियेची रंगीत तालीम गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. मतमोजणी केंद्रात जाण्यापूर्वी झडती मतमोजणी केंद्रात मोजणी अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबरच उमेदवार आणि त्यांचे मोजणी प्रतिनिधी यांना प्रवेश असणार आहे. मात्र, मोजणी केंद्रांत प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाची झडती घेतली जाणार आहे. मोजणी केंद्रात कुणालाही पान, तंबाखू, गुटखा, सिगारेट यासारख्या वस्तू नेता येणार नाहीत. झडतीत या सर्व गोष्टींची तपासणी केली जाईल. तसेच कुणालाही आत मोबाईल घेऊन जाता येणार नाही. केवळ केंद्रीय निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि इतर काही वरिष्ठ अधिकार्यांनाच मतमोजणी केंद्रात मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी असेल, असे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले. मतमोजणी शेंद्रा एमआयडीसीत प्रशासनाने यावेळी लोकसभेची मतमोजणी शेंद्रा एमआयडीसीतील बी-२२ येथे ठेवली आहे. आतापर्यंत लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी शहरातील शासकीय कला महाविद्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात होत होती. यावेळी पहिल्यांदाच ही मतमोजणी शहराबाहेर तब्बल २४ किलोमीटर अंतरावर ठेवली आहे. शहरात मतमोजणी केंद्रांवर नेहमीच कार्यकर्त्यांची गर्दी ओसंडून वाहत असे. मात्र, आता मतमोजणी केंद्र इतके दूर असल्यामुळे यावेळी ही गर्दीही ओसरण्याची शक्यता आहे.
पहिल्यांदाच होणार शहराबाहेर मतमोजणी
By admin | Updated: May 12, 2014 00:40 IST