हिंगोली : जिल्ह्यात पणन महासंघाचे दोन खरेदी केंद्र सुरू असले तरी कापसाला खाजगी व्यापाऱ्याच्या तुलनेत कमी भाव मिळत असल्याने पणन कापूस केंद्रावर कापसाची आवक थंडावली आहे. आतापर्यंत केवळ ४६४ क्ंिवटल कापसाची खरेदी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात यंदा अल्पपर्जन्यमान असल्याने कापसाची लागवड मागील वर्षीच्या तुलनेत अतिशय कमी प्रमाणात झाली आहे. मागीलवर्षी कापसाची लागवड बऱ्यापैकी असली तरी पणनने जानेवारीपासून कापूस खरेदीस सुरुवात केली होती. तर मार्च २०१५ पर्यंत तब्बल ३७ हजार क्विंटलची खरेदी झाली होती. जिल्ह्यात सीसीआय, नाफेडचे केंद्र नसले तरी खाजगी व्यापारी मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी करीत आहेत. पणनपेक्षा दीडशे ते दोनशे रुपये वाढीव दर देत आहेत. हीच परिस्थिती यंदाही कायम असून, शेतकऱ्यांचा ओढा पणनपेक्षा खाजगी व्यापाऱ्यांकडेच जास्त प्रमाणात आहेत. पणन महासंघाचा ४१०० हा हमी भाव असून खाजगी व्यापारी ४ हजार ३८० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करीत आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी भाव वाढेल या आशेने कापूस घरातच ठेवला होता. मात्र अद्याप कापसाला वाढीव भाव मिळालेला नाही. यंदा अवर्षणामुळे कापसाचे उत्पादन अत्यल्प झाले. कापसाची साठवणूक करणेही परवडत नाही. कुणी थोडाही वाढवून भाव दिला की, थेट खाजगी व्यापाऱ्याकडे विकत आहेत. हयातनगर केंद्रावर आतापर्यंत १२३ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. अजूनही विदर्भात कापसाला वाढीव दर मिळत असल्याने बहुतांश शेतकरी तिकडे जात असल्याचे बाळापूर येथील अशोक पतंगे यांनी सांगितले. तर काही शेतकरी दीडशे ते दोनशे रुपये वाढून मिळत असल्याने खाजगी व्यापाऱ्याकडे कापूस विक्री करीत आहेत. (प्रतिनिधी)
पणनच्या केंद्रांवर कापसाची आवक मंद
By admin | Updated: December 15, 2015 23:31 IST