लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दोन दिवसांपूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील काही भागामध्ये कापूस आणि मुगाच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे़ बहुतांश भागामध्ये कापसाची लागवड सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे़ परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा खरीप हा महत्त्वपूर्ण हंगाम असून, यावर्षी सरासरी इतका पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची तयारी आधीच करून ठेवली होती़ जिल्ह्यात ५ लाख हेक्टर क्षेत्र खरीपाचे असून, यावर्षी लागवडीलायक क्षेत्रामध्ये वाढ होण्याची चिन्हे आहेत़ दरवर्षी मृग नक्षत्रामध्ये पाऊस झाल्यानंतर प्रत्यक्ष पेरण्यांना प्रारंभ होतो़ मागील काही वर्षांचे अनुभव पाहता जून महिन्यात पाऊस १५ ते २० दिवस लांबल्याने खरिपाच्या पेरण्या शक्य तो जुलैच्या पहिल्या आठवड्यात किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यात झाल्या होत्या़ यावर्षी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच पावसाची जोरदार हजेरी लागली आहे़ १० आणि ११ जून रोजी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला़ अनेक मंडळांमध्ये ४० ते ५० मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे़ या पावसावरच जिल्ह्यात काही भागांमध्ये पेरण्यांना सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांनी यावर्षी प्रथमच कापूस लागवडीला प्रारंभ केला आहे़ ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा आहे़, अशा शेतकऱ्यांबरोबरच कोरडवाहू शेतकऱ्यांनीही कापसाची लागवड सुरू केली असून, कापसासोबतच मुगाची पेरणीही केली जात आहे़ त्यामुळे खरीप हंगामामध्ये शेतकरी पेरता झाला आहे़ जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पेरण्या सुरू झाल्या असल्या तरी किती क्षेत्रावर पेरण्या झाल्या़ याची अधिकृत माहिती कृषी विभागाकडे उपलब्ध नाही़ पुढील आठवड्यात ही माहिती संकलित होईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले़
जिल्ह्यात कापूस, मुगाच्या पेरण्या सुरू
By admin | Updated: June 15, 2017 00:03 IST