मंठा : येथील नगर पंचायतच्या नगराध्यक्षाची निवड मंगळवारी होत असताना नगरसेवक इलियास कुरेशी यांना चार अपत्य असल्याबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यावर उद्या सुनावणी होणार असल्याची नोटीस बजावण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.मंठा नगर पंचायतमध्ये शिवसेना ९, काँग्रेस ५, भाजपा ३ असे पक्षीय बलाबल आहे. नगराध्यक्षासाठी शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ असताना शिवसेना नगरसेवक इलियास चाँदसाब कुरेशी यांना चार अपत्त्य असल्याची तक्रार इसामोद्दीन बसोरोद्दीन पटेल, कय्युम महेमूद खाटीक या दोघांनी केली असून, त्यावर उद्या सुनावणी होणार असल्याचे पत्रकान्वये कळविले आहे. उपजिल्हाधिकारी डॉ.एन.आर. शेळके यांनी संबंधितांना म्हणणे मांडण्यास उपस्थित न राहिल्यास काहीही म्हणणे नाही, असे समजून निर्णय घेण्यात येणार असल्याचे पत्रात म्हटले आहे. उद्या काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भाजपाला काँग्रेस कुठल्याही स्थितीत मदत करणार नसल्याचे चित्र आहे. तर शिवसेनेला कॉंग्रेस बाहेरुन मदत करु शकते, असे मत नाव न छापण्याच्या अटीवर एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले. (वार्ताहर)
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवक अपात्रतेबाबत निर्णय आज!
By admin | Updated: November 22, 2015 23:40 IST