औरंगाबाद : कोरोनाकाळात सुरू झालेले लॉकडाऊन व त्यामुळे बिघडलेली अर्थव्यवस्थेची घडी हा जरी एक भाग असला तरीदेखील त्याच्यात प्रत्यक्ष होणारी सर्वसामान्यांची, स्रियांची व विद्यार्थ्यांची होरपळ मांडण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेच्या ऑनलाइन विचार मंचावर केला, तर शिक्षण आणि रोजगार संधीला कोरोनाचे ग्रहण लागल्याचा सूर या स्पर्धेतून निघाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, ताराबाई शिंदे स्री अभ्यास केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना पदव्युत्तर विभागातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात अचानक सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे अभ्यासाची पुस्तके सोडून गावी जावे लागले. ग्रामीण भागातील विजेच्या समस्या, घरातील आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे घरात निर्माण झालेले आर्थिक प्रश्न मांडताना आपबितीही विद्यार्थ्यांनी मांडली. शिक्षण अचानकपणे थांबल्यामुळे भविष्यातील अनिश्चितेने अनेकांची लग्नदेखील लावण्यात आल्याचे सहभागी स्पर्धक म्हणाले. या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत एकूण ६४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रा. डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. अनिल जायभाये, डॉ. नागेश शेळके, डॉ. सोनाली क्षीरसागर, अश्विनी मोरे, मंजुश्री लांडगे, प्रा. डॉ. निर्मला जाधव, डॉ. सविता बहिरट यावेळी उपस्थित होत्या. संतोष लोखंडे, विकास टाचले यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.