औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र शासनाने १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू केली आहे. सुरुवातील गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना लसीकरणातून वगळण्यात आले होते. त्यामुळे लस कधी मिळणार? हा प्रश्न गर्भवती महिलांना पडला होता. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गर्भवती महिलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास मान्यता दिली. औरंगाबादेत लसींचा मुबलक साठा उपलब्ध होताच लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.
कोरोना लसीकरणाविषयीच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीने याबाबत शिफारस केली होती. त्यानुसार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कोविन पोर्टलवर पूर्व नोंदणी करून किंवा थेट लसीकरण केंद्रावर जाऊन गर्भवती महिलांना लस घेता येणार आहे. तसेच १८ वर्षांपुढील नागरिकांसाठीच्या प्रक्रियेनुसारच गर्भवती महिलांसाठी लसीकरणाची प्रक्रिया असेल, असे असे महापालिकेच्या आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले. महिलांना कोरोना लस देण्याबाबत जागरूक केले जाईल. या कामात आरोग्य विभागातील आशा वर्कर, इंडियन मेडिकल असोसिएशन, स्त्री रोगतज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. लस घेण्यासाठी गर्भवती महिलांनी पुढे यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. कोणती काळजी घ्यावी
गर्भवती महिलांनी लस घेतली नाही, तर बरेच नुकसान होऊ शकते. अकाली प्रसूती होऊ शकते, कमी वजन असलेल्या बाळाचा जन्म होऊ शकतो. तसेच बाळाचा मृत्यूही होऊ शकतो. गर्भवती महिलांनी कोरोनाबाबत खबरदारी घ्यावी. कोरोना विषाणूचा धोका गर्भवती महिलांना आहे. गर्भ अवस्थेत स्त्रियांमध्ये रोगांविरुद्ध लढण्याची क्षमता कमी असते. गर्भवती महिलांनी काळजी घेणे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. या महिलांनी अजिबात ताणतणाव घेणे टाळावे. आरामात राहावे, जेणेकरून तुमचे मन शांत राहील. गर्भधारणा शेवटच्या टप्प्यावर असेल तर डॉक्टरांकडून नियमित तपासणी करावी.
आतापर्यंत झालेले एकूण लसीकरण -
पुरुष- पहिला डोस- ३,९९,३७०
दुसरा डोस- ९९, ८४२
महिला पहिला डोस-३,१,२८९
दुसरा डोस- ७५,३२०
एकूण - ८,७५, ८११
गरोदर महिलांना लवकरच लस देण्यास सुरुवात करण्यात येईल. सध्या शहरात साठा उपलब्ध नाही. शासनाकडून लसीचा साठा उपलब्ध होताच स्वतंत्रपणे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. उलट फायदेशीरच आहे.
डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.
गरोदर महिलांनी लस घेणे फायदेशीर आहे. आतापर्यंत शासनाने गरोदर महिलांना लस घेण्यासाठी परवानगी दिली नव्हती. आता परवानगी देण्यात आली असून, कोणतीही भीती न बाळगता लस घ्यावी. प्रतिकारक्षमता वाढायला मदत होईल.
डॉ. अनुराधा शेवाळे, स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्ष