पळशी : मागील दीड वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट सुरू आहे. परिणामी शासनस्तरावर संसर्ग थांबविण्यासाठी लॉकडाऊन लावले गेले. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला असून, पोलीस, आर्मीत भरती होऊन करिअर करू पाहणाऱ्या युवकांनादेखील याचा फटका बसला आहे. कोरोना आला आमचे जीवनच करून गेला अशी संतप्त भावना युवकांमधून व्यक्त केली जात आहे.
आज ना उद्या कोरोनावर यशस्वी लस येईल. कोरोनाच्या संकटातून देश बाहेर येईल आणि मग परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येईल. उद्योगधंदे पुन्हा जोमाने सुरू होतीलच. अर्थचक्र गतिमान होण्यासाठी शासन त्यांना मदत करेल, पण आयुष्याचे स्वप्न पाहणाऱ्या आम्हा युवकांचे काय? भरती होण्याचे वय संपलेल असेल तेव्हा आमचे स्वप्न स्वप्नच राहील, अशी भावना युवकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या काळात भरतीची वयोमर्यादा वाढविण्याची मागणी केली जात आहे.
भरती रद्द झाल्याने संधी गेली
पोलीस भरतीसाठी मी खूप मेहनत घेत आहे. मात्र, एका वर्षांपूर्वी माझे वय संपले. मला भरती प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. गेल्या वर्षी मी नोकरभरतीचा फॉर्म मी भरलेला होता. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे भरती रद्द झाल्याने तीही संधी हातातून गेली. - रमेश बडक, उमेदवार.
भरती प्रकिया लवकर घ्या
मे महिन्यात आत पोलीस भरती घेण्यात यावी. अन्यथा बेरोजगार, पोलीस पुत्र, युवक, युवती मुख्यमंत्री यांच्या मातोश्रीसमोर जमा होऊन आंदोलन करू, असा इशारा मुख्यमंत्री कार्यालयाला दिलेल्या निवेदनात दिला आहे. - ॲड. प्रीतेशसिंग गौर, जिल्हाध्यक्ष, पोलीस बॉईज संघटना