प्रवासी वाहतुकीच्या व्यवसायाकडे पाठ : नवीन रिक्षा, टुरिस्ट कॅब, मिनी बस घेण्याच्या प्रमाणात मोठी घट
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. कोरोनाच्या भीतीपोटी सार्वजनिक प्रवासी वाहनांनी प्रवास टाळण्यावर भर दिला जात आहे. परिणामी, घराघरासमोर चारचाकी वाहने उभी राहत आहे. त्यामुळे नव्याने प्रवासी वाहतूक व्यवसाय सुरू करण्याचे धाडस कुणी करीत नाहीत. या सगळ्यामुळे नवीन रिक्षा, टुरिस्ट कॅब, मिनी बस घेण्याच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे.
औरंगाबाद शहराची उद्योगनगरी, पर्यटनगरी म्हणून जगभरात ओळख आहे. दरवर्षी लाखो पर्यटक, प्रवाशांची वर्दळ राहणाऱ्या शहराला कोरोनाचा मोठा फटका बसला. विशेषत: पर्यटक आणि प्रवासी वाहतुकीवर अवलंबून असलेल्या लोकांचे आर्थिक चक्र बिघडून गेले आहे. कोरोनापूर्वी महिन्याकाठी शहरात ६० ते १०० नव्या रिक्षांची भर पडत होती. परंतु कोरोनामुळे ही संख्या आता ११ ते ४० च्या घरात आली आहे. अशीच काहीशी अवस्था टुरिस्ट कॅब, मिनी बसची झाली आहे. एकीकडे ही स्थिती आहे. तर दुसरीकडे चारचाकी वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल कोरोनाकाळातही कायम आहे.
चौकट...
प्रवासी वाहतुकीच्या नव्या वाहनांची स्थिती
वाहनाचा प्रकार---एप्रिल २०१९ ते मार्च २०२०-----एप्रिल २०२० ते मार्च २०२१---------एप्रिल ते जून २०२१
रिक्षा-------------१०५५------------२२८------------१४
टुरिस्ट कॅब-------१८८---------------४७------------१५
स्टेज कॅरिज-----६०-------------------०--------०
काॅन्ट्रॅक्ट कॅरिज, मिनी बस--३००----------२२--------५
-----
नव्या चारचाकी वाहनांची स्थिती
कालावधी---------------संख्या
एप्रिल २०१९ ते मार्च २०२०---८,४०४
एप्रिल २०२० ते मार्च २०२१---८,२५४
एप्रिल ते जून २०२१------१,३६२
---------
जुन्या वाहतुकदारांचीच अडचण
पर्यटकांच्या वाहतुकीसाठी नवीन वाहने घेऊन या व्यवसायात येण्यास आता फारसे कोणी पुढे येत नाही. ज्यांच्याकडे आधीपासूनच वाहने आहेत, त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. वाहने विकायला काढली तरी कोणी घेत नाही. घेतली तर पैसे कमी येतात.
- जसवंतसिंह राजपूत, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशन
---
रिक्षाचालकच इतर व्यवसायाकडे
रिक्षाच्या व्यवसायात येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सध्याच्या रिक्षाचालकांनाच प्रवासी मिळण्यासाठी धडपड करावी लागते. अनेक रिक्षाचालक तर रिक्षा विकून दुसऱ्या व्यवसायाकडे वळत आहेत. जुन्या रिक्षाचालकांची संख्या खूप आहे.
- निसार अहेमद खान, अध्यक्ष, रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघ