औरंगाबाद : औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावरील फटाका बाजाराला २९ आॅक्टोबर रोजी लागलेल्या आगीप्रकरणी शनिवारी अखेर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात फटाका बाजाराच्या वेगवेगळ्या दोन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. औरंगाबाद शहर फायर वर्कर्स डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विलास पूनमचंद खंडेलवाल आणि अन्य पदाधिकारी तसेच संभाजीनगर फटाका असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा आरोपीमध्ये समावेश आहे. याविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, २९ आॅक्टोबर रोजी जि. प. मैदानावरील फटाका बाजार आगीत बेचिराख झाला. या भीषण दुर्घटनेत सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. मात्र तेथील १४० दुकाने, ११२ वाहने जळून खाक झाल्याने कोट्यवधीच्या राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान झाले होते. घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अग्निकांडाची सखोल चौकशी करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना दिले होते. शिवाय महानगरपालिका अग्निशमन दलानेही त्यांच्या स्तरावर या घटनेचा बारकाईने तपास केला. या तपासात अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. जि. प. मैदानावर फटाके स्टॉल्स लावण्यासाठी औरंगाबाद फायर वर्कर्स डीलर्स असोसिएशन व संभाजीनगर फटाका असोसिएशन यांनी पोलीस आयुक्त, महानगरपालिका यांच्याकडून परवानगी घेतली होती. हा परवाना घेताना अग्निशमन दलाने घातलेल्या अटी आणि शर्र्तींचे पालन करण्याचे लेखी वचनच त्यांनी दिले होते.एवढेच नव्हे तर घटनेच्या एक दिवस आधी पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत पदाधिकाऱ्यांनी फटाका बाजारात कोणतीही दुर्घटना होणार नाही, अशी ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात मात्र व्यापारी असोसिएशनने सुरक्षेची कोणतीही उपाययोजना या बाजारात केली नव्हती. अत्यंत धोकादायक पद्धतीने जि. प. मैदानावर १४० दुकाने थाटण्यात आली होती. अग्निशमन यंत्रणा, दोन दुकानांमध्ये चार फू ट अंतर ठेवण्याचे नियम पायदळी तुडविण्यात आले. दुकानांची संख्या जास्तीत जास्त कशी राहील आणि सहभागी व्यापाऱ्यांकडून पैसे उकळण्यात असोसिएशन प्रयत्नशील होती. नफा कमविण्याच्या उद्देशाने दुकानदार आणि सामान्य जनतेच्या जीविताला धोका पोहोचेल अशा पद्धतीने ही दुकाने थाटण्यात आल्याचे समोर आले.
फटाका बाजार जळीतकांडप्रकरणी अखेर गुन्हे दाखल
By admin | Updated: November 7, 2016 01:09 IST