औरंगाबाद, दि. ६ : केंद्र शासनाचा ‘डीएसटी सीड इनोव्हेशन हब’ हा प्रकल्प ग्रामविकासाला चालना देणारा आहे. विद्यापीठामार्फत हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विज्ञान, तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन हबच्या टेक्नॉलॉजी व्हॅनचे लोकार्पण कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याहस्ते मंगळवारी झाले. केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत अनुसूचित जाती-जमातीच्या सक्षमीकरणासाठी ‘डीएसटी सीड इनोव्हेशन हब’ प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. याअंतर्गत आगामी तीन वर्षांसाठी २ कोटी ६२ लाखांचा निधी या विभागाला मिळणार आहे. यासाठी विद्यापीठाने कन्नड तालुक्यातील चिकलठाण, नरसिंगपूर, देवगाव, लोहगाव, नागद व अंधोनर ही सहा गावे दत्तक घेतली आहेत. यासाठी ‘टेक्नॉलॉजी व्हॅन’ घेण्यात आली आहे.
यावेळी कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, प्रकल्पाचे प्रमुख डॉ. एम. डी. सिरसाठ, डॉ. भारती गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले, पारंपरिक शिक्षणासोबतच विद्यापीठाने संशोधन व नवनिर्मितीला प्राधान्य दिले आहे. ग्रामविकासात सहभागी होण्यासाठी विस्तार व सेवा राबविण्यात येत आहेत. या कामी जिल्हा प्रशासनाचे देखील सहकार्य घेण्यात येईल. कन्नड तालुक्यातील या सहा गावांना प्रत्यक्ष भेट देण्यात येईल, असेही कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले.
या व्हॅनमध्ये सौरआधारित पॅनल, कंट्रोल पॅनल, वायरिंग, पीएलसी प्रोग्रामिंग आणि शेती ऑटोमेशनसह बोर्ड प्रशिक्षण सुविधा देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती डॉ. एम. डी. सिरसाठ यांनी दिली. यावेळी डॉ. कुणाल दत्ता, प्रा. विशाल उशीर, प्रा. अशोक सांबरे व रत्नदीप हिराळे आदींची उपस्थिती होती.
कॅप्शन :
लोकार्पण सोहळ्यानंतर ‘टेक्नॉलॉजी व्हॅन’मधील सुविधांची पाहणी करताना कुलगुरू डॉ. प्रमोद येवले. सोबत कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, डॉ. एम. डी. सिरसाठ आदी.