लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेचे शिष्टमंडळ दोन दिवसांपूर्वीच चीन दौऱ्यावर रवाना झाले असून, मंगळवारपासून शिष्टमंडळाने चीनमधील चेंगुड शहराला भेट देऊन विविध विकासकामांसोबतच शहरातील स्वच्छतेच्या कामकाजाची पाहणी केली. शहरातील दूषित पाण्यावर कशा पद्धतीने प्रक्रिया करण्यात येते, याचाही अभ्यास केला.चीनमधील डुनहाँग शहरात १२ ते १७ जुलैदरम्यान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत महापौर बापू घडमोडे, माजी सभागृह नेता राजेंद्र जंजाळ, माजी उपमहापौर प्रमोद राठोड, नगरसेवक कचरू घोडके, महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मध्ये औरंगाबाद व चीनमधील डुनहाँग ही भगिनी शहरे (सिस्टर सिटी) होत असल्याची घोषणा केली होती. डुनहाँग येथे १२ ते १७ जुलैदरम्यान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिकेचे शिष्टमंडळ चीन दौऱ्यासाठी रवाना झाले. बीजिंग विमानतळावर शिष्टमंडळाला पोहोचण्यास उशीर झाला. त्यानंतर पाच सदस्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी विविध विकासकामांना भेटी दिल्या. चेंगुड शहराची लोकसंख्या औरंगाबादपेक्षा चारपट असतानाही तेथील स्वच्छता अप्रतिम असल्याचे दिसून आले. प्रत्येक कामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अत्यंत खुबीने वापर करण्यात आल्याचेही शिष्टमंडळास दिसून आले. शहरातील दूषित पाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्लँटलाही भेट देण्यात आली. अवघ्या ७५ कर्मचाऱ्यांवर हा प्लँट कशा पद्धतीने चालतो हे बघितले. येथेही अत्याधुनिक तंत्रज्ञानावर सर्वाधिक भर देण्यात आला होता. घनकचरा व्यवस्थापन असेल किंवा अन्य कोणताही प्रकल्प यावर देखरेख करण्यासाठी सीसीटीव्हीची मदत घेण्यात आली आहे. येणाऱ्या चार ते पाच दिवसांमध्ये आणखी काही प्रकल्पांना भेटी देण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळाने कळविले आहे.
महानगरपालिकेचा चीन दौरा सुरू
By admin | Updated: July 12, 2017 00:48 IST