आखाडा बाळापूर : भरधाव वेगाने जाणार्या कंटेनरने नरवाडी शिवारात दुचाकीस उडविले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य एकजण गंभीररित्या जखमी झाला. हा अपघात बाळापूर- हिंगोली रस्त्यावर नरवाडी शिवारात १६ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वा दहा वाजता घडला. कळमनुरी येथील रहिवासी असलेले जमीरखाँ सलीमखाँ पठाण (वय २४) व शेख तौसिफ शेख रहीम हे दोघेजण नवीन विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून आखाडा बाळापूर जवळील कांडली येथे लग्न समारंभासाठी जात होते. सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास कंटेनर (क्र. एम.आर. ५५ एस. ३३३१) हा हिंगोलीकडे भरधाव वेगात जात होता. नरवाडी शिवारात कंटेनरने सदर दुचाकीस अक्षरश: चिरडले. यात जमीरखाँ पठाण हा युवक जागीच ठार झाला. तर शेख तौसिफ हा गंभीर जखमी झाला. कळमनुरीच्या ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी हिंगोलीला हलविले. धडक दिल्यानंतर कंटेनरचालक गाडी सोडून पळून गेला. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अली करीत आहेत. /(वार्ताहर)
कंटेनरने दुचाकीस उडवले; १ जागीच ठार
By admin | Updated: November 17, 2014 12:20 IST