गांधी भवनात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.
त्यांनी सांगितले, नामांतरासारख्या भावनिक विषयांमध्ये काँग्रेस विश्वास ठेवत नाही. त्यापेक्षा आम्हाला विकासाचे मुद्दे महत्त्वाचे आहेत.
विभागीय आयुक्तांनी संभाजीनगरचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. हे मला आज औरंगाबादला आल्यावर कळले. त्यावर योग्य ती चर्चा होईल. पण काँग्रेसचा संभाजीनगरला पाठिंबा राहणार नाही.
कोरोनाच्या काळात मला औरंगाबादला यायला जमले नव्हते. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. सध्या तरी शहरातील सर्वच वाॅर्डांची तयारी काँग्रेस करणार आहे, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
ते म्हणाले, भाजपची राजनिती आम्हाला मान्य नाही. त्यांना दूर ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करु.
१२ आमदारांचा प्रश्न
१२ आमदारांच्या नियुक्तीचा विषय राज्यपालांकडे पडून आहे. मुख्यमंत्र्यांनी एकदा सही करून दिल्यानंतर प्रस्ताव रखडवून ठेवणे योग्य नाही. सदस्यांच्या मूलभूत अधिकारांना ते बाधा पोहचवत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
शेतकऱ्यांना १० हजार कोटींच्या पॅकेजचे नीट वाटप करून दिलासा दिला. मात्र केंद्र सरकारने अद्याप महाराष्ट्राच्या वाट्याचे ३० हजार कोटी रुपये जीएसटीचे दिले नाहीत, हे त्यांनी आवर्जून सांगितले.
नवीन शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांना बदलण्यात येणार नाही. त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करावे लागेल, असेही थोरात यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. त्यांना तत्काळ बदला अशी मागणी अलीकडच्या काळात जोर धरू लागली आहे. गुरुवारीही ही मागणी लावून धरण्यात आली.
लवकरच महामंडळांची यादी जाहीर करण्यात येईल अशी माहिती देत एम. आय.एम कुणाच्या इशाऱ्यावर काम करते हे वेगळे सांगण्याची गरज नाही,असा आरोप त्यांनी केला.
प्रारंभी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी प्रास्ताविक केले. मंचावर काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.