उस्मानाबाद : उमरगा, लोहारा तालुक्याने निधी पळविल्याची ओरड यापूर्वीही अनेकवेळा झालेली आहे. मात्र, तेव्हा विरोधक ओरड करीत होते. परंतु, गुरूवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये चक्क सत्ताधारी काँग्रेस सदस्यांनीही आरोपाच्या फैरी झाडल्या. सुवर्ण जयंती दलित वस्ती विकास योजनेअंतर्गत आलेल्या निधीतील एक छदामही अन्य तालुक्यांना मिळाला नाही, याचे गुपित काय? असा सवाल चेडे यांनी अध्यक्षांना उद्देशून केला. सत्ताधारीच सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या तोफा डागत असल्याचे दिसताच विरोधकांनीही यात उडी घेतली. राष्ट्रवादीचे सदस्य मधुकर मोटे, नानासाहेब जाधवर यांनी या दोनच तालुक्यांना कोणत्या निकषांवर निधी दिला? असा सवाल करीत अध्यक्षांसह अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर काँग्रेसचे ेउपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनीही नाराजी व्यक्त केली. सर्वसाधारण सभा असो की, स्थायी समितीची बैठक. यामध्ये काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस असे चित्र पहावयास मिळते. परंतु, गुरूवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत याच्या उलट चित्र होते. बैठकीला सुरूवात झाल्यानंतर काही मिनिटामध्येच काँग्रेसचे सदस्य प्रशांत चेडे यांनी सुवर्ण जयंती दलित वस्ती विकास योजनेअंतर्गत वितरित केलेल्या निधीचा विषय उपस्थित केला. याबाबत अधिकाऱ्यांनी उत्तर दिले असता सर्व निधी उमरगा आणि लोहारा या दोनच तालुक्यांना दिल्याचे समोर आले. अन्य तालुक्यांच्या पदरामध्ये एक छदामही पडला नसल्याने चेडे अधिक संतप्त झाले. त्यावर चेडे यांनी या दोनच तालुक्यांना कोणत्या निकषाआधारे निधी दिला? अशी विचारणा अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे यांच्याकडे केली. त्यावर दोन तालुक्यात जास्त लाभार्थी असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. सत्ताधारीच सत्ताधाऱ्यांवर आरोप करीत असल्याने विरोधकांना आयते कोलित मिळाले. राष्ट्रवादीचे सदस्य मधुकर मोटे यांनी दोन वगळता अन्य तालुक्यात लाभार्थी नाहीत का? असा सवाल केला. जे काही लाभार्थी असतील त्यांना निधी देणे अपेक्षित असतानाही हा प्रकार झालाच कसा? असा प्रश्न अध्यक्ष व अधिकाऱ्यांना उद्देशून केला. एकीकडे स्थायी समितीला जिल्हा परिषदेची ‘सुप्रीम कमिटी’ म्हणायचे आणि दुसरीकडे जलव्यवस्थापन समितीत झालेले निर्णय ‘स्थायी’समोर येवू द्यायचे नाहीत. मग या समितीला ‘सुप्रीम कमिटी’ म्हणायचे तरी कसे? असा सवाल केला. त्यानंतर झालेला हा प्रकार अन्य तालुक्यांवर अन्याय करणारा असल्याचे सांगत, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनीही नाराजी व्यक्त केली. निधी वाटपात असा भेदभाव होवू नये, असे सांगत यापुढे जलव्यवस्थापन समितीने घेतलेले निर्णय स्थायी समितीसमोर ठेवण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. बैठकीस दत्ता साळुंके, नानासाहेब जाधवर आदी उपपस्थित होते.किती निधी, पत्ता नाही...अधिकाऱ्यांच्या अंदाजे उत्तराने संतप्त झालेले चेडे यांनी सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत किती निधी आला होता? असा सवाल पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांना विचारला. परंतु, त्यांना तेही सांगता आले नाही. त्यावर आलेला निधी माहित नसेल तर तुम्ही करता काय? असा सवाल चेडे आणि मोटे यांनी केला.अन्य तालुक्यातील सदस्य करतात काय?जल व्यवस्थापन समितीवर उमरगा आणि लोहारा तालुक्यासोबतच भूम, परंडा, वाशी, तुळजापूर, कळंब, उस्मानाबाद या तालुक्यातील सदस्यही आहेत. दोनच तालुके सर्वच्या सर्व निधी नेत असतानाही अन्य तालुक्यांतील सदस्य करतात तरी काय? असा प्रश उपस्थित होतो.भंगार मोटारी माथी मारू नकाकृषी विभागाच्या माध्यमातून पाणबुडी मोटारी वाटप करण्यात येतात. परंतु, त्या नामांकित कपन्यांच्या नसतात, असा आरोप बैठकीत सदस्यांनी केला. त्यावर यंदा मोटारी खरेदी करण्यापूर्वी कंपन्यांची यादी समितीसमोर ठेवण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. त्यावर उपस्थित सदस्यांमध्ये एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.े
काँग्रेस सदस्यांकडून अध्यक्षांनाच घरचा आहेर
By admin | Updated: July 11, 2014 00:59 IST