लातूर : लातूर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसकडून अॅड़ दिपक सूळ, राष्ट्रवादी काँग्रेसकडून इर्शाद तांबोळी, शिवसेनेचे गोरोबा गाडेकर यांनी उमेदवारी दाखल केली़ १२ मे रोजी महापौरपदासाठी निवडणूक होणार आहे़ अर्ज दाखल करण्यासाठी रविवार शेवटचा दिवस होता़ काँग्रेसचे बहुमत असलेल्या महापालिकेत महापौरपदासाठी अॅड़ दीपक सूळ यांच्या निवडीची केवळ औपचारिकता आहे.महापौरपदासाठी विभागीय आयुक्तांनी निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्यापासून काँग्रेस पक्षात इच्छुकांनी लॉबिंग सुरू केली होती़ शनिवारी रात्री उशिरापर्यंत बाभळगाव येथे आमदार अमित देशमुख यांनी इच्छुकांसह नगरसेवकांची मते जाणून घेतली़ शनिवारी काँग्रेसने ४ व राष्ट्रवादी काँग्रेसने एक अर्ज घेतला होता़ तर रविवारी शिवसेनेचे मनपात ६ सदस्य असतानाही त्यांनी महापौरपदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे़ काँग्रेस पक्षात इच्छुकांची संख्या अधिक असल्याने नेमकी कोणाची वर्णी लागणार, यावर गेल्या आठ दिवसांपासून चर्चा सुरू होत्या़ रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत काँग्रेसकडून असगर पटेल, दिपक सूळ यांच्या नावाची चर्चा होती़ काँग्रेसच्या नगरसेवकांची रविवारी सकाळी १० वाजता काँग्रेस भवन येथे बैठक होणार होती, परंतू नाव निश्चित झाले नसल्याने दुपारी ४ वाजता बैठक झाली़ यावेळी शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांनी पक्षाने दिलेल्या आदेशाचे पालन करून सर्व नगरसेवकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले़ तसेच आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमदार अमित देशमुख हे जो निर्णय घेतील, त्या निर्णयाला आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा, अशी सूचना केली़ यावेळी माजी महापौर स्मिता खानापुरे, माजी उपमहापौर सुरेश पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दगडूसाहेब पडिले, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, चाँदपाशा घावटी यांची प्रमुख उपस्थिती होती़ शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नगरसेवक अॅड़ दिपक सूळ यांच्या घरी गेले होते़ यावेळी त्यांच्यासमवेत काही नगरसेवकांची चर्चा झाली होती़ मात्र, काँग्रेसमध्येच राहिलेल्या दिपक सूळ यांना महापौरपदासाठी पक्षाने उमेदवारी दिली़ संजय सावंत यांच्या पदस्पर्शानेच सूळ यांना महापौरपदाची उमेदवारी मिळाल्याची उपरोधिक टीका शिवसेनेचे महानगरप्रमुख रवी सुडे यांनी केली़ काँग्रेस भवन येथे नगरसेवकांची बैठक सुरू झाली असताना पाच मिनिटात नेत्यांकडून नाव येणार असल्याचे सांगण्यात आले़ शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख सभागृहातील एका खोलीत गेले़ काँग्रेसचे नेते आमदार अमित देशमुख यांना त्यांनी फोन केला आणि तिकडून नाव आले दिपक सूऴ मोईज शेख सभागृहात येताच त्यांच्या पाठीमागे येत असलेल्या गिरीष पाटील यांनी दिपक सूळ यांना इशारा केला, लागलीच मोईज शेख यांनी दिपक सूळ यांच्या नावाची घोषणा केली़ लागलीच सर्व नगरसेवकांनी मनपात जाऊन दिपक सूळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला़\लातूर महापालिकेत काँग्रेसचे ४६, राष्ट्रवादी काँग्रेसचे १३, शिवसेनेचे ६ व रिपाइंचे २ नगरसेवक आहेत. अख्तर शेख यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचे सदस्यत्वही रद्द झाले आहे. त्याचबरोबर विक्रमसिंह चौहान यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर मतदान झाले असले तरी विजयी उमेदवाराच्या निकालावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. काँग्रेसचे बहुमत असल्याने अॅड. दीपक सूळ यांच्या नावावर महापौर म्हणून १२ मे रोजी शिक्कामोर्तब होईल. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता आहे. १२ मे रोजीच नामनिर्देशनपत्र माघार घेता येणार आहे. त्यामुळे कोण माघार येणार, हे त्याच दिवशी निश्चित होईल.
काँग्रेसकडून महापौरपदासाठी दीपक सूळ
By admin | Updated: May 8, 2016 23:48 IST