सेनगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हमालीचे दर वाढवून देण्याच्या मागणीसाठी गुरूवारपासून हमालांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले होते. शनिवारी हमाल संघटना व बाजार समिती प्रशासन यांच्यात झालेल्या तडजोडीच्या चर्चेनंतर कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले. त्यामुळे दोन दिवसांपासून बंद असलेला मोंढा शनिवारी दुपारी पुर्ववत सुरू झाला.हमालीचे दर क्विंटलला ७ रुपयावरून १२ रूपये करावेत, या मागणीसाठी सेनगाव येथील हमाल संघटनेने अचानक कामबंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनामुळे दोन दिवसांपासून येथील बाजार समितीमध्ये व्यवहार पुर्णत: ठप्प झाले होते. ऐन दुष्काळात मोंढा बंद असल्याने शेतकऱ्यांसमोर शेतीमाल विकावा कोठे? याचा पेच निर्माण झाला होता. शनिवारी बाजार समितीचे सभापती नारायण खेडेकर, उपसभापती आप्पासाहेब देशमुख, सचिव गणेश देशमुख, व्यापारी प्रतिनिधी केदार सारडा, गिरीधारी तोष्णीवाल, बालमुकंद जेथलिया, संजय देशमुख, सुधाकर जैन, हमाल प्रतिनिधी अरसलखाँ पठाण, संतोष इंगोले, देवराव नवघरे, अंकुश तिडके आदींच्या उपस्थितीत चर्चा झाली. यावेळी सभापतींनी बाजार समिती मंजूरी घेऊन हमाली व मापारीचे दर वाढवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हा संप हमाल मापारी संघटनेने मागे घेतला. (वार्ताहर)
तडजोडीने मिटला हमालांचा संप
By admin | Updated: November 15, 2014 23:54 IST