औरंगाबाद : विभागीय शासकीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नुकतीच लिव्हरच्या डाव्या बाजूला कॅन्सरची गाठ असलेल्या एका ६८ वर्षीय रुग्णावर दुर्मिळ व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. त्यामुळे या रुग्णाला नवीन जीवन मिळाले.कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपूर्वी सिल्लोड तालुक्यातील सदर रुग्ण दाखल झाला होता. त्याच्या लिव्हरच्या डाव्या बाजूला कॅ न्सरची गाठ असल्याचे निदान झाले होते. यामुळे पोटात दुखणे, भूक कमी होणे असा त्रास होतो. गाठ मोठी झाल्यास धोका वाढतो. त्यामुळे शस्त्रक्रिया करून ही गाठ दूर करणे आवश्यक होते. त्यासाठी लिव्हरचा काही भाग काढून टाकणे आवश्यक ठरते. परंतु या ठिकाणी असलेल्या रक्तवाहिन्यांच्या जाळ्यामुळे ही शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुतीची आणि दुर्मिळ मानली जाते. शस्त्रक्रियेत लिव्हरचा काही भाग काढून टाकल्यावर रक्तवाहिन्या बंद कराव्या लागतात. अशी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्याचे आव्हान येथील डॉक्टरांनी उचलले. तीन तास चालेली ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. या रुग्णास सुटीही देण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेसाठी घाटीचे अधिष्ठाता डॉ.चंद्रकांत म्हस्के, कॅन्सर हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.अजय बोराळकर, डॉ. मारोती पोटे, डॉ.ललित बन्सवाल, डॉ.अमोल जाधव, डॉ.नितीन सिंघल, भूलतज्ज्ञ डॉ. साधना कुलकर्णी, डॉ. सोनल चौधरी, डॉ.स्नेहा सिकची यांनी परिश्रम घेतले.दोन महिन्यांत यकृत पूर्वपदावरअशा वेळी लिव्हरचा ६० टक्के भाग काढता येतो. अवघ्या दोन ते तीन महिन्यांत लिव्हर पुन्हा पूर्वपदावर येते. अशा प्रकारे पूर्वपदावर येणारा यकृत हा एकमेव अवयव आहे. सदर रुग्णावर आषाढी एकादशीच्या वारीच्या कालावधीत शस्त्रक्रिया झाली. कपाळावर गंध, गळ्यात माळ यामुळे त्यांना रुग्णालयातीलसर्व जण विठ्ठल म्हणत होते, असे डॉ.अजय बोराळकर यांनी सांगितले.
गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
By admin | Updated: July 22, 2016 00:45 IST