उस्मानाबाद : टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून सुमारे ९ हजार कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या अभियानात मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्हा आघाडीवर असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. सदरील कामांवर आजवर ५७ कोटी १५ लाख रूपये खर्च झाले आहेत.जिल्ह्यात कळंब , भूम व परंडा, वाशी हे तालुके अवर्षप्रवण क्षेत्रात मोडतात. तर इतर पाच तालुके अवर्षण क्षेत्रात येतात. त्यामुळे या तालुक्यांमध्ये अनियमित व कमी पाऊस पडतो. परिणामी उन्हाळा आला की शेकडो गावांमध्ये टंचाईची स्थिती निर्माण होते. हीच बाबी लक्षात घेवून प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांची प्राधान्याने जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत निवड केली आहे. त्यानुसार गावनिहाय आरखडे तयार करून लोकसहभागाच्या माध्यमातून नाला सरळीकरण, खोलीकरण आणि बंधाऱ्याची कामे हाती घेण्यात आली. सदरील अभियान राबविण्यात उस्मानाबाद जिल्हा हा मराठवाड्यात अव्वल आहे. आजपर्यंत सुमारे ९ हजार १५५ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यावर थोडेथोडके नव्हे, तर ५७ कोटी १५ लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच आणखी ७ हजार २५२ कामे प्रगतीपथावर असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
नऊ हजारावर कामे पूर्ण
By admin | Updated: June 22, 2015 00:19 IST