औरंगाबाद : हजारो नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या केबीसी कंपनीविरुद्ध गुंतवणूकदारांच्या तक्रारींचा आर्थिक गुन्हे शाखेकडे ओघ सुरूझाला आहे. लवकरच या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे गुन्हे शाखेचे प्रभारी सहायक आयुक्त अविनाश आघाव यांनी सांगितले. कमीत कमी दिवसांमध्ये गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून नाशिकच्या केबीसी या कंपनीने राज्यभरातील हजारो गोरगरीब नागरिकांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले आणि आता कंपनीने गाशा गुंडाळला आहे. या कंपनीने केलेला घोटाळा हजारो कोटी रुपयांचा असल्याचे समोर येत आहे. केबीसीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी आपली शेतीवाडी, दागदागिने व इतर मालमत्ता विकून किंवा गहाण ठेवून गुंतवणूक केली आहे. कंपनीने गाशा गुंडाळल्यामुळे हे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. शनिवारी अनेक तक्रारदारांनी केबीसीविरुद्ध तक्रार घेऊन आर्थिक गुन्हे शाखा गाठली. या सर्व नागरिकांच्या तक्रारी घेण्यात आलेल्या आहेत. सर्वांना पुरावे आणून देण्याचे सांगण्यात आले आहे. सर्वांच्या तक्रारी आणि पुरावे गोळा झाल्यानंतर लवकरच केबीसीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात येईल, असे अविनाश आघाव म्हणाले. ग्रामीण भागातील नागरिक ‘टार्गेट’केबीसीने शहरी भागाऐवजी ग्रामीण भागातील गोरगरीब, भोळ्याभाबड्या नागरिकांना ‘टार्गेट’ केले होते, असे आता समोर येऊ लागले आहे. सुरुवातीला गुंतवणूक करणाऱ्या ग्रामीण भागातील एजंटांना कंपनीने भरभरून परतावे दिले. या परताव्यातून एजंटांना आलिशान चारचाकी वाहने घ्यायला लावली. शिवाय विदेशात ट्रीपवर नेले.या एजंटांची केबीसीमुळे झालेली प्रगती पाहून खेड्यापाड्यातील गोरगरीब, अडाणी नागरिकांना केबीसीची भुरळ पडली. जे कंपनीलाही अपेक्षित होते. त्यामुळेच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात केबीसीमध्ये गुंतवणूक झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मावसगव्हाण या अख्ख्या गावाने केबीसीत गुंतवणूक केल्याचे काल ‘लोकमत’ने समोर आणले होते. मावसगव्हाणप्रमाणेच जिल्ह्यात अशी अनेक गावे असल्याचे आता समोर येत आहे.
केबीसीविरुद्ध तक्रारींचा ओघ सुरू
By admin | Updated: July 20, 2014 01:00 IST