औरंगाबाद : आगामी चार दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांच्यासह पालिकेतील अधिकाऱ्यांच्या विरोधात नगरसेवकांनी पोलिसांत तक्रार करावी. नगरसेवकांनी तक्रार न केल्यास शिवसेना पक्ष स्वत: पोलिसांत तक्रार देईल, असा इशारा खा.चंद्रकांत खैरे यांनी आज सुभेदारी विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत दिला. खा.खैरे म्हणाले, नागरिक मनपासह आम्हाला फोन करून शिव्या घालीत आहेत. अधिकारी पालिकेत नसतात. नागरिकांच्या समस्या सोडविण्यात मनपा कमी पडत असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्यास कोण जबाबदार आहे, याचा आढावा घेण्यासाठी महावितरण कंपनी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज झाली. बैठकीला सभागृह नेते किशोर नागरे, महावितरणचे मुख्य अभियंता शंकर शिंदे , शहर अभियंता एस. डी. पानझडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, पी. आर. बनसोडे, अधीक्षक अभियंता आदिनाथ सोनवणे, गणू पांडे, नगरसेवक ज्ञानेश्वर जाधव, उपअभियंता के. एम. फालक, वसंत निकम, यू. जी. शिरसाठ आदींची उपस्थिती होती. बेगपुऱ्यात पाणीटंचाई असल्यामुळे आज नागरिकांनी सुभेदारी विश्रामगृहातील बैठकीला हजेरी लावली. तेथील जलकुंभ भरत नाही, असा आरोप नागरिकांनी केला. २ जूनपासून शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा होत नाही. असे असताना बैठकींऐवजी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना व नियोजन करण्यासाठी आराखडा तयार करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. ‘लोकमत’च्या वृत्ताचे वाचनपालिकेत किती अधिकारी दांड्या मारतात. याचे स्टिंग आॅपरेशन लोकमतने मध्यंतरी केले होते. खा.चंद्रकांत खैरे यांनी ते वृत्तच बैठकीमध्ये वाचून दाखविले. आचारसंहितेच्या काळापासून अधिकारी पालिकेत मनमानीपणे काम करीत आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला.पुन्हा समांतरवर चर्चासमांतर जलवाहिनीचे काम अजून कागदावरच आहे. शासनाने मंजुरी दिली असली तरी योजनेच्या शुभारंभाचा मुहूर्त ठरलेला नाही. समांतर ‘बोंबलल्यामुळे’ शहरात पाण्याची बोंब असल्याचे सांगून अभियंते मोकळे झाले. अभियंत्यांचे ते उत्तर ऐकून खा.खैरेही चिडले. आयुक्तांमुळे समांतर जलवाहिनीचे काम रखडल्याचा आरोप त्यांनी केला. जायकवाडीत पाणी भरपूर; मनपाच्या नियोजनात दोष! औरंगाबाद : महापालिकेच्या प्रभागनिहाय जलवितरण यंत्रणेतच दोष असल्याचे स्पष्ट झाले आहे. जायकवाडीतून कधी नव्हे ते १५६ एमएलडी पाणी उपसण्यापर्यंत मनपाचा यांत्रिकी विभाग मजल मारीत आहे. तेवढे पाणी शहरापर्यंत येत नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. यंदा तर हर्सूल तलावातही भरपूर पाणी आहे. असे असतानाही शहर पाण्यासाठी व्याकूळ होत आहे. १३६ एमएलडी पाणी शहरातील ५८ जलकुंभांपर्यंत पोहोचत आहे. शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे, तर दुसरीकडे जायकवाडी ते औरंगाबाद शहरापर्यंत येणाऱ्या दोन जलवाहिन्यांतून सुमारे २० एमएलडी पाण्याची गळती होत आहे. ही गळती आहे की, पाण्याची चोरी हा संशोधनाचा विषय आहे; परंतु औरंगाबादकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मनपाच्या जलउपसा केंद्रापर्यंत पाण्याचा प्रवाह येण्यासाठी अॅप्रोच चॅनलचे काम गतवर्षी दुष्काळात करण्यात आले. त्यामुळे उपसा केंद्रापर्यंत पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात आहे. तेथून दररोज १५० ते १५६ एमएलडी पाणी उपसले जात आहे. मात्र, शहरापर्यंत पोहोचेपर्यंत त्यातील २० एमएलडी पाणी मध्येच गळत आहे. नगरसेवकांना कुठून मिळते पाणीनागरिक पाण्यासाठी ओरड करतात. मात्र, नगरसेवक, पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या घरी पाण्याचा ठणठणाट असल्याची ओरड अजून तरी आलेली नाही. नागरिकांना घेऊन नगरसेवक पालिकेवर आंदोलन करतात. सुरळीत पाणीपुरवठ्याला लागणार दोन दिवस शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार आहेत. शुक्रवारपासून वीजपुरवठा सुरळीत होत आहे. त्यामुळे रविवारपर्यंतचा पाणीपुरवठा कोलमडला नाही. मंगळवारनंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती यांत्रिकी विभागाचे उपअभियंता यू.जी. शिरसाठ यांनी दिली. महावितरण कंपनीने अतिरिक्त फिडरचे काम सुरू केले आहे. हे काम पूर्ण होताच पुढच्या आठवड्यात सुरळीत पाणीपुरवठा होण्यात काहीही अडथळा राहणार नाही, असेही ते म्हणाले.
पोलिसांकडे तक्रार द्या
By admin | Updated: June 9, 2014 01:10 IST