औरंगाबाद : महापालिकेच्या मालमत्ताकराच्या थकबाकीचा डोंगर वाढतो आहे. त्यामुळे कर वसुलीसाठी प्रशासन वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करीत आहे. गुरुवारी मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया मालमत्ताकराच्या थकबाकीसाठी स्वत: रस्त्यावर उतरले. त्यांनी सायंकाळी पैठणगेटवर दोन दुकानदारांकडे चौकशी केली. त्या दुकानदारांनी तातडीने ३७ हजार ८०० रुपयांचा धनादेश आयुक्तांकडे सुपूर्द केला.मालमत्ताकराची थकबाकी २८५ कोटी रुपयांवर गेल्यामुळे प्रशासन गेल्या काही दिवसांपासून कर अदालतीचे आयोजन करीत आहे. प्रत्येक प्रभागातील १०० बड्या थकबाकीदारांना नोटिसा बजावून त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या जात आहेत. प्रभाग ‘ड’ मधील साडेचारशे कोटी रुपयांची थकबाकी असलेल्या नागरिकांना गेल्या आठवड्यात तर काल बुधवारी प्रभाग ‘फ’ मधील नागरिकांची कर अदालत घेण्यात आली. त्यात ३ लाख ३३ हजार रुपयांची वसुली झाली होती. कर अदालतीमध्ये नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या चुका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या. काही मालमत्तांचा कर तर क्षुल्लक कारणांवरून थकीत असल्याचे समोर आले. गुरुवारी आयुक्तपैठणगेट येथील एका फुटवेअरच्या दुकानात गेले. दुकानदार नसीर अहेमद यांच्याकडे कर भरल्याच्या पावतीची विचारणा केली असता, त्यांनी चालू वर्षाचा कर भरलेला नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी आयरिस टेलर या दुकानात चौकशी केली. त्यांनीदेखील कर भरलेला नव्हता. आयुक्तांच्या आवाहनानंतर या दोघांनी ३७ हजार ८०० रुपयांचा धनादेश आयुक्तांना दिला. विशेष म्हणजे यावेळी आयुक्तांसोबत मनपाचा एकही अधिकारी नव्हता. 1शहरातील व्यावसायिक मालमत्ताधारकांकडून ८० टक्के वसुली झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळे आयुक्तांनी स्वत: व्यापारी प्रतिष्ठानांना भेटी देण्याचा निर्णय घेतला आहे. 2शहरातील कोणत्याही भागात जाऊन पाहणी करण्यात येणार असून, व्यावसायिकांनी कर भरल्याच्या पावत्या सोबत ठेवाव्यात, असे आवाहन आयुक्त बकोरिया यांनी केले आहे.
कर वसुलीसाठी आयुक्त रस्त्यावर
By admin | Updated: July 29, 2016 01:13 IST