उस्मानाबाद : गत पाच वर्षातील आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींवर टीका केली आहे़ शिवसेनेशी हातमिळवणी करण्याच्या नादात काँग्रेस पक्षाची जिल्ह्यात दुर्दशा झाली असून, दोन मतदार संघात काँग्रेस उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे़ तर चव्हाण यांच्या विरोधात जवळपास ७० टक्के लोकांनी मतदान केले असून, मतविभाजनामुळे ते निवडूण आले आहेत़ अन्यथा त्यांना यावेळी घरी बसावे लागले असते, असा टोमणाही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी प्रत्युत्तरादाखल काढलेल्या पत्रकात मारला आहे़आ़ चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या़ चव्हाण यांच्या आरोपांचे खंडण करीत बिराजदार यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले, तत्कालीन पाटबंधारे मंत्री डॉ़ पद्मसिंह पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे उजनी पाणीपुरवठा योजना व २५ टीएमसी पाणी योजनेस मंजुरी मिळाली आहे़ मंत्रीमंडळात ज्येष्ठ नेते असलेले मधुकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचे असताना रेटा लावून धरला असता तर २५ टीएमसी पाण्याची योजना पूर्णत्वास आली असती़ मात्र, योजनेच्या किंमतीत दरवर्षी वाढ होत होती़ तेवढा पैसाही उपलब्ध करून दिला नाही़ आपली कार्यक्षमता लपविण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे अर्थ व जलसंधारण खाती असल्यामुळे ही योजना रखडल्याचे सांगत आ़ चव्हाण हे जबाबदारी झटकत असल्याचेही पत्रकात म्हटले आहे़जिल्हा बँकेलाही शासकीय मदत मिळवून देण्यासाठी गप्प का राहिलात ? बँकेतील जिल्हा परिषदेची खाती इतरत्र वळविताना आपण गप्प का राहिलात ? असे सवालही उपस्थित केले आहेत़शिवाय तुळजाभवानी कारखान्याबाबत, लोकमंगलला कारखाना भाडेतत्त्वावर देण्याबाबत चुकीची विधाने करण्यात आल्याचेही बिराजदार यांनी पत्रकात म्हटले आहे़ तसेच उजनी पाणीपुरवठा योजनेला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ६० कोटी दिल्याचे सांगितले जाते़ मात्र, आजपर्यंत पूर्ण रक्कम पालिकेला मिळाली नाही़ उजनी पाणीपुरवठा योजनेमुळे उस्मानाबादकरांचा पाणीप्रश्न मिटला असून, खानापूर येथे पंप हाऊस सुरू झाल्यानंतर शहरवासियांना मुबलक पाणी मिळणार आहे, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)
अकार्यक्षमता झाकण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका
By admin | Updated: November 3, 2014 00:39 IST