उपस्थिती ३२.८२ टक्के : नववी ते बारावीचे जिल्ह्यात ११५८ पैकी ११२० शाळांत भरले वर्ग
---
औरंगाबाद : शहरात सोमवारी नववी व दहावीचे वर्ग भरले. त्यामुळे शहरातील ३६१ पैकी ३५८ शाळा, महाविद्यालयांत नववी ते बारावीपर्यंत वर्ग सुरु झाले आहेत. सोमवारी ७८ हजार ३८८ पैकी २३ हजार ५१६ विद्यार्थी उपस्थित होते. दहा महिन्यांनतर विद्यार्थी शाळेच्या गेटवर पोहचले. त्यावेळी त्यांच्याकडून पालकांचे संमतीपत्राची विचारपूस करत प्रत्येकाला मास्कची सक्ती करण्यात आली होती. तर प्रवेशद्वारावर थर्मल गनने तपासणी करुन हातावर सॅनिटायझरचा फवारा मारुन शाळेत प्रवेश दिला जात होता.
जिल्ह्यात एकूण ११५८ शाळांत नववी ते बारावीचे वर्ग आहेत. सोमवारपर्यंत ११२० शाळांत या चार इयत्तांचे वर्ग सुरु झाले. शहरातील ३५८ शाळांतील ७८ हजार ३८८ पैकी २३ हजार ५१६ विद्यार्थी सोमवारी उपस्थित होते. तर ग्रामीण मधील ७६२ शाळांतील २ लाख ६७ हजार ७१९ पैकी ६४ हजार ३७२ विद्यार्थी उपस्थित होते अशी माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी दिली. शहरातील १६४८ पैकी १५३७ शिक्षकांची तर १५२५ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी त्यात ३ शिक्षक तर २ शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे.
ग्रामीणमध्ये २३ नोव्हेंबरला नववी ते १२ वीचे वर्ग सुरु झाले. तर शहरात १५ डिसेंबरला ११ वी व बारावीचे तर सोमवारी ९ वी व दहावीचे वर्ग सुरु करण्यात आले. त्यासाठी शाळा प्रशासनाकडून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी करुन घेण्यात आली. शाळांचे निर्जंतुकीकरण मोहीम रविवारी राबवण्यात आली. तर सोमवारी शाळांच्या प्रवेशद्वारावर पालकांसह विद्यार्थ्यांची गर्दी दिसत होती. दहा महिन्यांनतर वर्ग मित्र मैत्रिणी भेटल्याने विद्यार्थी एकमेकांची विचारपूस करण्यात गुंग होते. तपासणीनंतर त्यांना शाळांच्या आत सोडल्या गेले.
----
नववी ते बारावीची स्थिती
---
-शहरातील विद्यार्थ्यांची उपस्थिती २९.९९ टक्के
-ग्रामीण विद्यार्थ्यांची उपस्थिती ३३.९९ टक्के
-जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची ३२.८२ टक्के
-शहरात सुरु झाल्या ३५८ शाळा
-ग्रामीणमध्ये सुरु झाल्या ७६२ शाळा
-७ शिक्षक, ३ कर्मचारी आढळले बाधित
---