बीड : केंद्रसरकारच्या सुचनेनुसार जिल्ह्यात आनलाईन एफआयआर नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात आॅनलाईन एफआयआर कसा नोंदविता येतो, याची रंगीत तालीम सुरू आहे. गुन्हेगारांची व गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपींची सर्व देशात एकाच वेळी माहिती व्हावी, यासह विविध उद्देश समोर ठेवून आॅनलाईन पद्धतीने एफआयआर नोंदणीला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व संबंधित ठाणे अंमलदारांना बीड जिल्हा पोलीस कार्यालयात ट्रेनिंग दिले जात आहे.सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पोलिसांना एफआयआरची नोंदणी करता येईल. तत्पूर्वी गुन्हा दाखल करण्यासाठी जी प्रक्रिया आहे तीच राहणार आहे. एफआयआर नोंदणीसाठी कोणीही व्यक्ती आला तर त्याची संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना ठाणे अंमलदाराद्वारे माहिती देण्यात येते. तसेच उपविभागीय अधिकारी यांनाही माहिती सांगण्यात येते. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार एफआयआर नोंदविण्यात येतो. आॅनलाईन एफआयआर झाल्यानंतरही हीच प्रक्रिया राहणार आहे. फरक फक्त एवढाच होईल की, सामान्य नागरिकांना वेबसाईटवरून एफआयआर पाहता येईल व त्याची प्रिंटही घेता येईल. तंत्रज्ञान विकसित होत चालले असल्याने त्याचा लाभ करून घेण्याचा हा एक प्रयत्न केला जात आहे. आॅनलाईन एफआयआर संदर्भात पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व ठाण्यांना चार कॅम्प्युटर देण्याच्या सूचना केलेल्या आहेत. प्राथमिक स्तरावर सॉफ्टवेअरची पाहणी सुरू आहे. सद्य स्थितीला काही पोलीस ठाण्यांमध्ये आॅनलाईन एफआयआर अपलोड करून त्यातील त्रूटी शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही अडचणी आल्यास त्या ट्रेनिंग विभागाला कळविण्यात येत आहेत. त्यात सुधारणा करण्यात येत आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना आल्यानंतर या प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक ठाण्याला इंटरनेट कनेक्शन देण्यात आले आहे. प्रशिक्षण देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यांत आॅनलाईन एफआयआर नोंदणीस सुरुवात होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
आनलाईन एफआयआरची रंगीत तालीम
By admin | Updated: September 5, 2014 00:57 IST