औरंगाबाद : ‘चल करूया नेमकी सुरुवात आता, अन् मुळापासुनी उखडूया जात आता... रंग हिरवा, पांढरा, भगवा कशाला, रंग प्रेमाचा भरूया हृदयात आता...’ अशा सामाजिक विषयांवर भाष्य करणाºया गजलांपासून ते ‘नको त्याच वेळी तुझा भास होतो, तुला काय त्याचे मला त्रास होतो...तिºहाईत आता तुला वाटतो मी, कधीकाळी तुझा मी खास होतो...’ यासारख्या हळुवार गजलांपर्यंतच्या अनेक रचनांनी रसिकांची रविवारची संध्याकाळ शब्दफुलांनी फुलवून टाकली.ब्रह्मकमळ साहित्य समूह मुंबई या ग्रुपच्या वतीने रविवारी गीता भवन येथे मराठी गजल मुशायºयाचे आयोजन करण्यात आले होते. मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवणे आणि प्रा. वृंदा देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली.सतीश दराडे, रणजित पराडकर, राजीव मासरूळकर, गिरीश जोशी, गणेश घुले, स्रेहदर्शन शहा, विजय वडवेराव, एजाज शेख, विशाल राजगुरू आणि अध्यक्ष शेख इक्बाल मिन्ने या गजलकारांनी गजल सादर करून रसिकांची ‘वाहवा...’ मिळविली.‘आतल्या कोलाहलाला बांग देता येत नाही, गाढ निद्रेतून हल्ली जाग येता येत नाही... जन्म एखादी अशी जागा रिकामा ठेवतो की, जुळवता येतो उखाणा, नाव घेता येत नाही..’ अशा एकापेक्षा एक सरस असणाºया गजलांनी ही शब्द मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. नरेंद्र गिरीधर यांनी उत्तम सूत्रसंचालन करून रसिकांना खिळवून ठेवले. कार्यक्रमाला रसिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
‘रंग प्रेमाचा भरूया हृदयात आता...’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:10 IST