उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीचा आखाडा शांत होतो न होतो तोच संचालक मंडळाची मुदत संपलेल्या जिल्हाभरात ८७९ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. डिसेंबरपूर्वी या सर्व संस्थांच्या निवडणूका घेण्याबाबत आयोगाने कळविले आहे. त्यानुसार प्रक्रियेलाही सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये तेरणासोबतच अन्य सहा कारखान्याची निवडणूक होणार आहे.जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था संचालक मंडळाची मुदत संपूनही विविध कारणांमुळे निवडणूका लांबणीवर पडल्या होत्या. जवळपास २०१०-११ पासून निवडणूका झाल्याच नाहीत. तब्बल पाच वर्षानंतर अशा संस्थांच्या निवडणुकीला मुहूर्त मिळाला आहे. यामध्ये ८७९ संस्था निवडणुकीसाठी पात्र ठरल्या आहेत. या संस्थांची राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्यामार्फत निवडणूक घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी घेणे अनिवार्य आहे. सदरील निवडी तीन टप्प्यात होणार आहेत. यामध्ये ‘अ’ वर्गातील ६ कारखान्यांचा समावेश आहे. यात बाणगंगा सहकारी साखर कारखाना ईडा, भाऊसाहेब बिराजदार साखर कारखाना समुद्राळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना केशेगाव, तेरणा साखर कारखाना ढोकी, विठ्ठलसाई साखर कारखाना मुरुम आणि शिवशक्ती साखर कारखाना वाशी यांचा समावेश आहे. त्यानंतर गट ‘ब’ मधील तीन नागरी बँका, सहा नागरी पतसंस्था, ५० विविध कार्यकारी सोसायट्या आणि ७ खरेदीविक्री संघाचा समावेश आहे. ‘क’ वर्गामध्ये ८७ नागरी पतसंस्था (एक कोटीपेक्षा कमी ठेवी असलेल्या), ९३ विविध कार्यकारी सोसायट्या (१० लाखापेक्षा कमी भागभांडवल असलेल्या), १ पाणीपुरवठा संस्था आणि इतर १२६ संस्थांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)सहकारी संस्थांचे संचालक मंडळ हे जास्तीत जास्त २१ सदस्यांचे असणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती/जमाती, इतरमागासप्रवर्ग आणि भटक्या जाती/जमाती प्रत्येकी एक, दोन महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गातील सहा ते सोळा सभासदांचे मिळून संचालक मंडळ असणार आहे. ‘ड’ वर्गातील संस्थांच्या निवडणूका घेण्यासाठी सहकार खात्यासोबतच अन्य विभागातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, वकील, प्रमाणित लेखा परिक्षक, सहकारी बँकाचे अधिकारी यांचे पॅनल निवडणूक आयोगाकडून तयार करण्यात येणार आहे. या वर्गामध्ये २३८ संस्था असून, या संस्थांचा निवडणूक कृती कार्यक्रम तयार करुन तो निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला असून, मंजुरी मिळताच प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.
सहकारी संस्थाच्या निवडणुकीचा बिगूल
By admin | Updated: October 17, 2014 00:27 IST