केज: तालुक्यातील चिंचोली (माळी) येथील केंद्रीय जिल्हा परिषदेच्या प्राथमीक शाळेमागील रस्त्यालगतच्या पऱ्हाट्याच्या फासावर तीन ते चार महिन्यांचे मृत अर्भक शनिवारी सकाळी सापडले. त्याचे पोस्टमार्टम केले असता डॉक्टरांनी ते अर्भक मुलगा असल्याचे रिपोर्टमध्ये लिहिले. मात्र पोलिसांनी अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल करताना ते अर्भक स्त्री जातीचे असल्याचे डायरीला लिहिले. यामुळे सापडलेल्या अर्भकाचे लिंग कोणते होते, हे कळू शकले नाही. चिंचोली माळी येथे शनिवारी सकाळी सातच्या सुमारास गावातील महिलांनी जि.प. शाळेच्या मागील पऱ्हाट्याच्या फासावर एक अर्भक उघड्या अवस्थेत अढळून आले. ही वार्ता गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली. रस्त्यालगतच प्राथमिक आरोग्य केंद्रही आहे. तेथील कर्मचाऱ्यांना हे वृत्त कळाल्यानंतर त्यांनी ते पाहिले. कर्मचाऱ्यांनी पोलीस पाटील आत्माराम राऊत यांना घटनेची माहिती देऊन बोलविले. त्यांनी हे अर्भक चिंचोली माळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता ते मृतावस्थेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलीस पाटील राऊत यांनी केज पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध फिर्याद दिली. जमादार राजेसाहेब पवार यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी अर्भक अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठविण्यात आले.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उत्तरीय तपासणीच्या रिर्पोटमध्ये हे अर्भक पुरुष जातीचे असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे हे अर्भक कोणत्या लिंगाचे आहे, याची निश्चिती झाली नाही.(वार्ताहर)फिर्यादीत स्त्री जातीचे अर्भक असल्याचा उल्लेख केज पोलीस ठाण्याचे जमादार ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, उत्तरीय तपासणीत हे अर्भक पुरुष जातीचे असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रिपोर्टमध्ये म्हटले आहे. पोलीस पाटील आत्माराम राऊत यांना ते अर्भक स्त्री जातीचे असल्याचे वाटले. त्यामुळे त्यांनी फिर्यादीत तसा उल्लेख केला आहे. त्या महिलेचा तपास सुरु असून लवकरच अटक करण्यात येईल.
केज तालुक्यात सापडलेल्या अर्भकाच्या लिंगावरून गोंधळ
By admin | Updated: July 20, 2014 00:35 IST