पाचोड : पैठण तालुक्यातील पाचोड गावासह पाचोड परिसरातील विविध गावावर गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यात अधूनमधून होणाऱ्या रिमझिम पावसामुळे रब्बी हंगामातील पिकेच धोक्यात आली असून गहू व हरभरा पिकांवर संक्रांत आली आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.
दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली. त्यानंतर कशीबशी रब्बी पेरणी केली. तर त्यावर नव्याने ढगाळ वातावरणाचे संकट उभारले आहे. रिमझिम पावसामुळे धुक्यामुळे रब्बी हंगामातील पिके हातातून जातात की काय अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या काही शेतकऱ्यांना भरपाई देखील मिळालेली नाही. काही शेतकऱ्यांनी कपाशी उपटून रब्बी हंगामातील हरभरा व गव्हाचे पीक पेरणी केली. सुरूवातीला निसर्गाने साथ दिल्याने गहू, हरभरा जोमात आलेला आहे. पण गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाचोड परिसरात ढगाळ वातावरण पडले आहे. सर्वत्र धुके पडल्याने पिकांना धोकादायक वातावरण तयार झाले आहे.
तुरीला बसला जोरदार फटका
ढगाळ वातावरणाने सर्वात जास्त फटका हा तुरीच्या पिकाला बसू लागला आहे. काही शिवारात तुरीचे खळे सुरू झाले आहे. याच कालावधीत अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अगदी हाताशी आलेली तुरीचे नुकसान होऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उरले आहे.