उस्मानाबाद : नुकसान भरपाई मिळावी यासाठी तडवळा येथील १०१ शेतकऱ्यांनी १ लाख ३१ हजार ६५ रुपये इतका पीक विमा हप्ता बँकेकडे भरला. मात्र बँक आणि विमा कंपनी यांच्यातील गोंधळामुळे संबंधित शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. वारंवार चकरा मारुनही संबंधित शेतकऱ्यांची केवळ आश्वासनावर बोळवण केली जात आहे.शेती हा व्यवसाय बिनभरवशाचा मानला जातो. कधी दुष्काळामुळे तर अतिवृष्टीमुळे तर कधी रोगराईमुळे पिकांना फटका बसतो. अशा संकटातून सावरण्यासाठी शासनाने राष्ट्रीय कृषी विमा योजना सुरु केली. या योजनेला शेतकऱ्यांचा भरभरुन प्रतिसाद लाभत आहे. मागील दोन वर्षापासून जिल्हा बँक आर्थिक संकटाचा सामना करीत असल्याने २०१२-१३ मध्ये कसबे तडवळे येथील १०१ शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बँकेच्या शाखेमध्ये पीक विमा हप्त्यापोटी १ लाख ३१ हजार ६५ रुपये इतकी रक्कम जमा केली होती. येथील शाखेकडून ही रक्कम सोलापूर येथील झोनल कार्यालयाकडे जमा केली. मात्र सदरील कार्यालयाकडून विमा कंपनीकडे सदरील प्रस्ताव पाठविण्यास विलंब झाला, असे सांगण्यात येते.दरम्यान, या दोन्ही कार्यालयातील गोंधळामुळे संबंधित प्रस्ताव विमा कंपनीला प्राप्त होण्यास विलंब झाला. त्यामुळे विमा कंपनीने १०१ शेतकऱ्यांचे प्रस्ताव पुन्हा बँकेकडे पाठविले. त्यावर बँकेने पाठपुरावा केल्यानंतर सदरील प्रस्ताव विमा कंपनीने शासनाकडे पाठवून मार्गदर्शन मागविले. त्यावर शासनाने संबंधित शेतकऱ्यांना लाभ द्या असे निर्देश विमा कंपनीला दिले. ही प्रक्रिया होवून काही महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र संबंधित शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला जात असला तरी केवळ आश्वासने मिळत आहेत, असे लाभार्थी शेतकरी दगडू बोरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)कसबे तडवळे येथील १०१ शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बँकेत पीक विमा हप्त्याची रक्तम जमा केली होती. सदरील प्रस्ताव विमा कंपनीकडे वेळेत पाठविण्यात आले होते. मात्र काही कारणामुळे संबंधित शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास विलंब झाला आहे. याबाबत बँकेने विमा कंपनीकडे पाठपुरावा केल्यानंतर शासनाने शेतकऱ्यांना लाभ देण्याचे निर्देश दिले आहेत. येत्या १५ दिवसांमध्ये संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळेल, असे महाराष्ट्र बँकेचे शाखा व्यवस्थापक किरणकुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
भरपाई लटकली
By admin | Updated: September 11, 2014 01:06 IST