जालना : स्वच्छता कर्मचारी तसेच त्यांच्या वारस नियुक्तीबाबतच्या अनेक प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात या मागणीसाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी बुधवारी सुरू केलेला संप दुसऱ्या दिवशीही सुरूच होता. त्यामुळे पालिकेचे सर्वच विभागातील कामकाज पूर्णपण ठप्प झाले होते. संपकऱ्यांची चौकशी करण्यासाठी कोणीही न फिरकल्याने संताप व्यक्त होत आहे. स्वच्छता कर्मचारी पालिकेत जाण्यासापासून कर्मचाऱ्यांना मज्जाव करत आहेत. पालिकेतील सर्वच म्हणजे पंधरापेक्षा अधिक विभाग बंद आहेत. कोणतेच कामे होत नसल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संपाबाबत बोलण्यासाठी पालिकेत अधिकारी अथवा कर्मचारी नाहीत. विशेष म्हणजे मुख्याधिकारी दीपक पुजारी हे रजेवर असल्याचे सांगण्यात येते. भारतीय स्वच्छकार एकता मंचच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. मराठवाडा उपाध्यक्ष गुलाबराव रत्नपारखे म्हणाले, कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन रखडले आहे. ३४ महिन्यांचा महागाई भत्ता रखडला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना गणवेश दिलेला नाही. चार वर्षांपासूनचे शिलाईचे पैसे रखडले आहेत. अडीचशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा या संपााला पाठिंबा असल्याचे सांगण्यात येते. स्वच्छता कर्मचाऱ्यांचा संप असला तरी नगर पालिकेतील कर्मचारीही आपल्या विभागात दिसून आले नाही.
स्वच्छता कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरूच
By admin | Updated: April 22, 2016 00:25 IST