जालना : नगरपालिकेच्या वतीने २१ आॅगस्ट रोजी शहरातील विविध भागात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सफाईसाठी ३०८ कर्मचारी तसेच १३ ट्रॅक्टर, घंटागाडी, कॉम्पॅटर, मिनिलोडर, जेसीबी या वाहनांचा समावेश होता.जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेने ही स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. आज जुना जालन्यातील झोन क्रमांक १ मध्ये ही मोहीम सुरू झाली. भाग्यनगर, इन्कमटॅक्स कॉलनी, घायाळनगर, लोकमान्य शाळा, सराफनगर, इंदिरानगर, वृंदावन कॉलनी, कचेरी रोड, नरिमाननगर, सोनलनगर, शनिमंदिर परिसर, भोईपुरा, हरिओमनगर या भागात ही मोहीम राबविण्यात आली. सकाळी ७ वाजता ही मोहीम सुरू करण्यात आली. दिवसभर या मोहिमेअंतर्गत स्वच्छता मोहिमेचे काम सुरू होते. नाल्यांमधील कचरा अनेक दिवसानंतर काढल्यामुळे काही ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे जमा झाले होते. नाल्यांवर धूर फवारणीही करण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत मिर्झा बेग, स्वच्छता विभागप्रमुख डी.टी.पाटील, चंद्रकांत जैन आदी उपस्थित होते. यापुढे देखील ही विशेष स्वच्छता मोहीम सुरूच राहणार असल्याचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी सांगितले.नगरपालिकेने अनेक दिवसानंतर विशेष स्वच्छता मोहीम सुरू केल्याने शहरातील नागरिकांमध्ये समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. मात्र ही विशेष स्वच्छता मोहिम यापुढेही सतत सुरू रहावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. या स्वच्छता मोहिमेसाठी काही नागरिकांनी स्वत:हून सहकार्य केल्याचे दिसून आले. नगरपालिकेचे विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी सुद्धा यावेळी उपस्थित होते. ज्या भागात ही मोहीम सुरू आहे, तेथील पालिकेचे लोकप्रतिनिधीही कामाची पाहणी करून योग्य त्या सूचना करीत आहेत. (प्रतिनिधी) विशेष स्वच्छता मोहीम जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या सुचनेवरून सुरू करण्यात आली आहे. नवीन जालना व जुना जालना भागात सर्वत्र ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी सांगितले. या मोहिमेसाठी सफाई कामगारांचा मोठा वर्ग, विविध प्रकारची वाहने एकाच वेळी संबंधित भागात लावून स्वच्छता मोहिमेचे काम करण्यात येत आहे.
जालना शहरात पालिकेने राबविली स्वच्छता मोहीम
By admin | Updated: August 22, 2014 00:57 IST