विशाल सोनटक्के। लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : केंद्र आणि राज्य शासनाने सर्वाधिक जोर दिलेल्या स्वच्छ भारत अभियानाची जिल्ह्यातील वाटचाल बिकट असल्याचे चित्र आहे़ तालुके पाणंदमुक्त करण्याच्या तारखा जवळ आल्या असतानाही जिल्ह्याला यात केवळ ५३ टक्के यश मिळालेले आहे़ विशेष म्हणजे, कळंब आणि परंडा तालुक्यातील परिस्थिती आणखीनच चिंतानजक असल्याचे दिसून येते़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी जयंतीदिनी देशभरात स्वच्छता अभियानाला सुरूवात केली़ केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनानेही ही महत्त्वकांक्षी योजना तडीस नेऊन स्वच्छ भारत साकारण्याचे स्वप्न पाहिले आहे़ त्या दृष्टीने प्रशासन कामालाही लागले आहे़ मात्र, त्यानंतरही नागरिकांच्या पुढाकाराअभावी जिल्ह्यात या अभियानाला अपेक्षित गती मिळालेली नसल्याचे प्रशासनाने दिलेली आकडेवारी सांगते़ जिल्ह्यात २ लाख ५४ हजार ७६० कुटुंबे आहेत़ ३१ मार्च २०१७ अखेर यातील एक लाख १९ हजार २४ कुटुंबाकडे शौचालये आहेत़ २०१७-१८ या वर्षामध्ये एक लाख ३५ हजार ६८३ कुुटुंबाकडे शौचालय उभारण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे़ सद्यस्थितीत भूम तालुक्यात ६०१, कळंब- १४६७, उमरगा- ८६, उस्मानाबाद- ३११८, परंडा- २२५, तुळजापूर- ११४४ तर वाशी तालुक्यात ५१० शौचालयांची उभारणी सुरू असून, ११ मे अखेर भूम तालुक्याने स्वच्छ भारत अभियानांतर्गत ५५़१४ टक्के एवढे काम पूर्ण केले आहे़ कळंब तालुक्यात ४०़१८ टक्के, उमरगा- ४९़५२ टक्के, उस्मानाबाद ५१़३३ टक्के, तुळजापूर- ४७़८४ टक्के तर वाशी तालुक्यात ७१़०२ टक्के एवढे उद्दीष्ठ साध्य करण्यात प्रशासनाला यश आले आहे़ मात्र, कळंब, परंड्यासह तुळजापूर तालुक्यातील स्वच्छ भारत अभियानाचे काम अद्यापही ५० टक्क्यांच्या आतच असल्याने हे तालुके ठरवून दिलेल्या तारखेत आपले उद्दीष्ठ पूर्ण करणार का ? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ विशेष म्हणजे, जिल्ह्यातील तुलनेने अत्यंत छोट्या असलेल्या लोहारा तालुक्याने मात्र आपले उद्दीष्ठ पूर्ण केले आहे़
‘स्वच्छ भारत’ची वाटचाल बिकटच..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2017 00:36 IST