तामलवाडी : सोलापूर महानगरपालिकेच्या सोलापूर-मंगरुळ या सिटीबसला तुळजापूर तालुक्यातील कुंभारी-कोरेगाव साठवण तलावाजवळ अचानक आग लागली. आगीत गाडी जळून खाक झाली. बसचालकाने प्रसंगावधान दाखविल्याने कसलीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान, बसला लागलेल्या आगीचा फटका रस्त्यालगत असलेल्या ऊसाच्या फडाला बसला. या आगीत तीन एकर ऊस जळून खाक झाला.मंगरुळ, कुंभारी, कोरेवाडी, पिंपळा (खु), सुरतगाव या गावकऱ्यांच्या मागणीवरुन सोलापूर महापालिकेच्या परिवहन विभागाने दोन महिन्यापासून सोलापूर ते मंगरुळ व्हाया कुंभारी, पिंपळा (खु) मार्गे ग्रामीण प्रवाशासाठी सुरु केली आहे. बुधवारी सकाळी १०.३० वाजता प्रवाशांना घेवून सोलापूरहून तामलवाडीकडे निघाली. प्रवाशी चढउतार करत १२ वाजता ती बस कोरेवाडी, कुंभारी साठवण तलावाजवळून आली असता, अचानक धावत्या बसला आग लागली. ही बाब चालक अरुण राठोड (रा. फताटेवाडी) यांच्या लक्षात येताच त्यांनी बस (एम.एच. १३ बी. ९६११) मधील मंगरुळ येथील एक प्रवाशी व वाहक अरविंद पवार (रा. गुंजेगाव ता. द. सोलापूर) यांना बसमधून तात्काळ खाली उतरविले. या आगीमध्ये बस पूर्णत: जळून खाक झाली. आग लागल्याचे लक्षात येताच कुंभारी, मंगरुळ, कोरेवाडी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेवून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. शेजारीच असलेला साठवण तलावही कोरडा असल्याने आग विझविण्यासाठी पाणी उपलब्ध होवू शकले नाही. त्यानंतर सुमारे तासाभराने तुळजापूर नगर पालिकेच्या अग्निशामक दलाची गाडी दुपारी १ च्या सुमारास घटनास्थळी दाखल झाली. या आगीत जवळपास १५ ते २० लाख रुपयाचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. (वार्ताहर)
सोलापूर आगाराची सिटीबस पेटली
By admin | Updated: August 6, 2015 00:05 IST