औरंगाबाद : कोरोनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेन आहेत. काही स्ट्रेन अत्यंत धोकादायक असल्याचे समोर येत आहे. धोकादायक स्ट्रेनचा मुकाबला करण्यासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेने शहरात मेगा लसीकरण मोहीम सुरू केली आहे. राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या लसीचा साठा संपत आला आहे. तीन दिवस पुरेल एवढाच साठा महापालिकेकडे उपलब्ध आहे. महापालिकेने राज्य शासनाकडे एक लाख लसीची मागणी केली.
महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, शहरात पूर्वीच्या तुलनेत कमी प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. मृत्यूची संख्या कमी व्हायला तयार नाही. नागरिकांनी लस घेतल्यानंतर कोरोना झाला तरी नुकसान फारसे होणार नाही. त्यामुळे महापालिकेने मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. दररोज साडेचार ते पाच हजार नागरिकांना लस देण्यात येत आहे. महापालिकेकडे सध्या तीन दिवस पुरेल एवढाच नाशिकचा साठा उपलब्ध असून, राज्य शासनाकडे आणखी एक लाख लसीची मागणी केली. शहरात सध्या १ लाख ५२ हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये महापालिकेला राज्य शासनाकडून लसीचा साठा प्राप्त न झाल्यास महापालिकेला मेगा लसीकरण मोहीम थांबवावी लागणार आहे.
राज्य शासनाकडे फक्त १४ लाख लस उपलब्ध
राज्य शासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी बुधवारी औरंगाबाद शहरातील अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत कोरोना रुग्णसंख्या आणि लसीकरणाचा आढावा घेण्यात आला. मुंबईतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी यावेळी राज्य शासनाकडे फक्त १४ लाख लसी उपलब्ध असल्याची माहिती दिली. त्यामुळे महापालिकेला राज्य शासनाकडून किती लक्ष प्राप्त होते, यावर संभ्रम आहे.