उस्मानाबाद : कनगरा ग्रामस्थांना पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीची सीआयडीमार्फत चौकशी सुरू आहे़ या चौकशीसाठी ग्रामस्थांचे जबाब नोंदविण्यासाठी सीआयडीचे पथक शुक्रवार व शनिवारी कनगरा (ता़उस्मानाबाद) येथील ग्रामपंचायतीत येणार आहे़कनगरा येथील महिला, ग्रामस्थांनी गावातील अवैधरित्या विक्री होत असलेली दारू बंद करावी, यासाठी बेंबळी पोलिसांकडे निवेदने, तक्रारी देवून मागणी केली होती़ दरम्यान, २६ मे २०१४ रोजी दारू विकणाऱ्यास रंगेहात पकडून महिलांनी पोलिसांना माहिती दिली होती़ यावेळी आलेल्या पोलिसांसोबत बाचाबाची होवून प्रकरण हाणामारीपर्यंत गेले होते़ यात पोलीस कर्मचारी जखमी झाले होते़ ही माहिती मिळाल्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली कडूकर व त्यांच्या फौजफाट्याने पहाटेपर्यंत कनगरा येथील ग्रामस्थांना घराबाहेर काढून जबर मारहाण करून अटक केली होती़ दुसऱ्या दिवशी (२७ मे ) उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यातील जखमींच्या अंगावरील मारहाणीची छायाचित्रे बाहेर आल्यानंतर ग्रामस्थांना झालेल्या अमानुष मारहाणीला वाचा फुटली होती़ हे प्रकरण राज्यभर गाजले होते. याप्रकरणी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती़ प्रारंभी काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबीत करून चौकशी करण्यात आली़ त्यानंतर या प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली. या चौकशीसाठी औरंगाबाद येथील पथक येत आहे़ ज्यांना या घटनेबाबत माहिती सांगावयाची असेल त्यांनी दोन दिवसाच्या कालावधीत किंवा कार्यालयीन वेळेत उस्मानाबाद कार्यालयाकडे द्यावी, असे आवाहन औरंगाबादच्या अप्पर पोलीस अधीक्षकांनी केले आहे़ (प्रतिनिधी)
‘सीआयडी’ पथक चौकशीसाठी आज कनगऱ्यात
By admin | Updated: January 9, 2015 00:50 IST