औरंगाबाद : ‘मी कधी कोणत्या नेत्याच्या प्रचारासाठी जात नाही. मात्र, राजेंद्र दर्डा हे एक विकासाभिमुख व्यक्तिमत्त्व आहे, राजकारणात चांगल्या व्यक्ती असाव्यात, अशी माझी इच्छा आहे. माझा त्यांच्यावर संपूर्ण विश्वास आहे. डीएमआयसीसारखा प्रकल्प त्यांनी औरंगाबादेत आणला. याद्वारे येत्या काळात १० लाख युवकांना नोकरी मिळेल. शहराचा चेहरामोहरा बदलून जाईल. यासाठी सर्वांनी ‘एक अच्छा आदमी’ला निवडून द्या, हे अंत:करणातून सांगण्यासाठी औरंगाबादेत आलो आहे’, अशी साद अभिनेता श्रेयस तळपदे याने तमाम तरुणाईला घालताच त्यास पाठिंबा दर्शवीत युवाशक्तीने जल्लोष केला व ‘एक अच्छा आदमी’ला निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला. लोकशाहीने प्रत्येक नागरिकाला मिळवून दिलेला अधिकार म्हणजे मतदान. या अधिकाराचा पहिल्यांदाच हक्क बजावणाऱ्या तरुणाईला त्यांचे एक मत किती महत्त्वाचे आहे आणि या अधिकाराचा उपयोग करून ‘एक अच्छा आदमी’ला निवडून द्या, असे आवाहन करण्याकरिता ‘जवाँ दिलों की धडकन’ अभिनेता श्रेयस तळपदे आज शहरात आला होता. तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या या अभिनेत्याने दिवसभरात विविध महाविद्यालयांत जाऊन तेथील युवक- युवतींशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत ऋषी दर्डा होते. सिडकोतील एका कॉलेजमध्ये श्रेयस तळपदेने प्रवेश करताच तरुणाईने त्यास घेरले. जल्लोषातच श्रेयसने माईक हाती घेतला आणि चाहत्यांशी थेट संवाद साधला. एरव्ही रुपेरी पडद्यावर आपण ज्या अभिनेत्याला पाहतो, तो प्रत्यक्ष आपल्यासमोर उभा आहे आणि प्रत्येकाशी संवाद साधत आहे हे पाहून अनेक जण भारावून गेले होते. मी कोणत्या पक्षाच्या, कोणत्याही नेत्याच्या प्रचाराला आलो नाही, असे स्पष्ट करीत श्रेयस म्हणाला की, राजकारणात चांगले नेते असावेत, ही सर्वांची इच्छा असते आणि राजेंद्र दर्डा यांच्या रूपात औरंगाबादला एक चांगला नेता मिळाला आहे. शहराच्या विकासाचा ध्यास घेतलेला. शहराचा चेहरामोहरा बदलून टाकण्याची ताकद असणाऱ्या या नेत्याला मतदारांनी निवडून द्यावे, असा आवाज माझ्या अंत:करणातून निघाला आणि आज तोच अंत:करणातील आवाज माझ्या चाहत्यांना ऐकवण्यासाठी चित्रपटाचे सर्व शूटिंग रद्द करून येथे आलो आहे, असे सांगताच उपस्थित तरुणाईने टाळ्यांचा कडकडाट केला. तत्पूर्वी, लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आम्ही मतदानाचा हक्क बजावू, अशी सामूहिक प्रतिज्ञा सर्व तरुणाईने घेतली. दुसऱ्या महाविद्यालयात श्रेयस तळपदे जेव्हा पोहोचला तेव्हा शेकडो युवकांनी जल्लोष करीत त्याचे स्वागत केले. आपल्या लाडक्या अभिनेत्याला मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यात येत होते. श्रेयस चाहत्यांकडे गुलाब फेकत होता. तो गुलाब आपणास मिळावा यासाठी अनेक जण प्रयत्न करीत होते. राजेंद्र दर्डा यांना शहराचा कायापालट करायचा आहे. त्यासाठी ते मनापासून अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. विकासाचा ध्यास घेतलेला हा ‘अच्छा आदमी’ निवडून यावा, हीच माझी इच्छा असल्याचे त्याने सांगताच तरुणाईनेही टाळ्या, शिट्या वाजवीत त्यास जोरदार पाठिंबा दर्शविला.एका महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात शेकडो युवक जमले होते. प्रत्येक जण मोबाईल कॅमेरात आपल्या आवडत्या अभिनेत्याचा फोटो काढून व्हॅटस् अॅपवर लोडही करीत होते. संपूर्ण शहर वाय-फाय करण्यात येईल, असे राजेंद्र दर्डा यांनी सांगितले आहे. यामुळे नेटीजन्सला मोठा फायदा होणार असल्याचे श्रेयसने सांगताच.‘दर्डाजी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणाही युवकांनी दिल्या.
शहराच्या विकासासाठी ‘एक अच्छा आदमी’ला निवडून द्या
By admin | Updated: October 10, 2014 00:42 IST