औरंगाबाद : व्हिडिओ कॉलिंग आणि कॉन्फरन्सिंग यंत्रणेची डिस्ट्रीब्युटरशिप देण्याच्या नावाखाली शहरातील एका व्यापाऱ्याला गुजरातच्या भामट्यांनी पावणे दोन लाख रुपयांना चुना लावल्याचे उघडकीस आले आहे. घटनेबाबत माहिती देताना जिन्सी ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी सांगितले की, गुजरातमधील ‘साई इन्फोसिस’ नावाच्या कंपनीने ‘व्हिडिओ कॉलिंग आणि कॉन्फरन्सिंग यंत्रणेची महाराष्ट्रासाठी डिस्ट्रीब्युटरशिप देणे आहे’, अशी आॅनलाईन जाहिरात केली होती. ही जाहिरात पाहून सुराणानगरातील रहिवासी मनोज रामनारायण राठी यांनी त्या कंपनीशी संपर्क साधला. तेव्हा कंपनीचा मालक सुनील कक्कड, प्रतिनिधी साहील, मुळे, सतीश कुंबानी, रविराज सिंग (रा. सर्व बोडकदेव, वरमपूर, अहेमदाबाद, गुजरात) यांनी राठी यांना डिस्ट्रीब्युटरशिप देण्याची तयारी दर्शविली. या यंत्रणेसाठी आपला बीएसएनएलशी टायअप झालेला आहे, असेही या आरोपींनी राठी यांना सांगितले. ही यंत्रणा बीएसएनएलशी संबंधित असल्याने राठी यांचा विश्वास बसला. आरोपींनी त्यांना डेमोही दाखविला. मग राठी यांच्याकडून डिस्ट्रीब्युटरशिपसाठी आरोपींनी १ लाख ६५ हजार रुपये घेतले. आरोपींनी डेमोसाठी दिलेली यंत्रणाच नंतर चालेना. तेव्हा राठी यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. तिकडून काही प्रतिसाद मिळेना. त्यांनी अधिक माहिती घेतली असता या कंपनीचा बीएसएनएलशी काही एक संबंध नसल्याचे आणि अशाच प्रकारे आमिष दाखवून कंपनीने देशभरात अनेकांना गंडा घातल्याचे राठी यांना समजले. लगेच त्यांनी काल जिन्सी ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली.
परराज्यातील भामट्यांनी व्यापाऱ्याला लावला पावणे दोन लाखाचा चुना
By admin | Updated: September 5, 2014 00:50 IST