कडा: आष्टी तालुक्यातील चोभा निमगाव येथे पाणीपुरवठा करण्यासाठी जलकुंभ उभारला आहे. या जलकुंभाला जागोजागी तडे गेल्याने दुर्घटना होण्याची शक्यता आहे. चोभा निमगाव येथील ग्रामस्थांना सुरळीत पाणीपुरवठा केला जावा, ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळावे यासाठी १९७२-७३ मध्ये येथे पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. यावेळी येथील चार हजार लोकसंख्या होती. यावेळी येथे जलकुंभही उभारण्यात आला होता. येथे उभारलेल्या जलकुंभाला आता चाळीस वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. जलकुंभाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. जलकुंभाचा काही भाग पाण्याने भिजल्यामुळे सिमेंटचे खपलेही उडालेले आहेत. असे असले तरी या जलकुंभातून सध्याही गितेवस्ती, झगडे वस्ती, पवार वस्ती, थेटे वस्तीसह चोभानिमगाव येथे पाणीपुरवठा केला जातो, हा जलकुंभ बांधल्यानंतर त्याची डागडुजी न केल्याने जलकुंभ आता धोकादायक झाला आहे. जलकुंभ जीर्ण झाल्याने तो पडू शकतो. यामुळे जीवित हानीही होऊ शकते, अशी दुर्घटना येथे होऊ नये यासाठी येथे नवीन जलकुंभ उभारण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे. या संदर्भात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता नाना हुले म्हणाले की, चोभा निमगाव येथील जलकुंभ दुरूस्तीसाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात येईल. (वार्ताहर)
चोभा निमगाव येथील जलकुंभाला तडे
By admin | Updated: June 23, 2014 23:53 IST